आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगनाविरोधात मराठी कलाकारांचा संताप:मुंबईची तुलना पाकव्याक्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला मराठी कलाकारांनी सुनावले, म्हणाले - 'ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा'

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाविरोधात मराठी कलाकारांकडून संतापाची लाट उसळली आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या मुद्द्यावरून चित्रपट अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. मुंबई पोलिसांची भीती वाटते, या कंगनाच्या वक्तव्यावर राऊत यांनी कंगनाला मुंबईत येऊ नये अशी आमची नम्र विनंती आहे. हा प्रकार म्हणजे मुंबई पोलिसांचा अपमानच आहे, असे म्हटलेे होते.

राऊत यांना उत्तर देताना कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे व मुंबईला परत येऊ नको, असे सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या व आता उघड धमकी मिळतेय. अखेर मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी (पीओके) का वाटत आहे?”, असे वक्तव्य कंगनाने केले आहे.

मुंबईची तुलना पाकव्याक्त काश्मीरशी केल्याने कंगना रनोटविरोधात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर अनेक मराठी कलाकारांनी तिला चांगलेच सुनावले आहे. मनसेने कंगनाला धमकीवजा इशारा दिल्यानंतर आता मराठी कलाकार सुबोध भावे, रेणुका शहाणे, स्वप्नील जोशी, केदार शिंदे, सई ताम्हणकर या कलाकारांनी तिच्यावर टीका केली आहे.

रेणुका शहाणे यांनी 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' असे ट्विट करत कंगनाच्या वक्तव्याचा समचार घेतला. तर अभिनेता सुबोध भावेदेखील कंगनाला उद्देशून 'ताई आपल्याला जे राजकारण करायचे असेल ते आपल्या गावाला जाऊन करा', असे म्हणाला आहे.
बघा कोण काय म्हणाले?

अभिनेता सुबोध भावेने कंगनाला चांगलेच सुनावले आहे. ''ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा.जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा.आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!'', असे सुबोध म्हणाला आहे.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही कंगनाचा समाचार घेतला आहे. ''प्रिय कंगना, मुंबई हे ते शहर आहे तिथे तुझे बॉलिवूड स्टार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या शहराचा तू थोडा तरी मान ठेवावा अशी अपेक्षा आहे. तू मुंबई आणि पीओकेची तुलना केली हे पटले नाही. हे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला,'' असे ट्विट त्यांनी केले आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही निषेध, कंगना व्हायरस म्हणत कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. 'या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवले! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात......', असे शिंदे यांनी म्हटले आहे.

अभिनेता स्वप्नील जोशीने मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील यावर आपली प्रतिक्रिया देताना ''मुंबई मेरी जान, कर्मभूमी, विषय संपला,'' असे म्हटले आहे.

अभिनेता रितेश देशमुखने अगदी मोजक्या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्याने कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. मात्र नेटक-यांना रितेशने हे ट्विट कुणाला उद्देशून केले आहे, ते लक्षात आले आहे.