आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिनी घोषणा:ललित प्रभाकरसोबत जमणार रिंकू राजगुरूची जोडी, 'खिल्लार'मधून होणार बैलगाडा शर्यतीचा जल्लोष

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपटात उडताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या 'खिल्लार' या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर ही जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना "खिल्लार" शुभेच्छा"

पुढे ती लिहिते, "भिर्रर्रर्र... महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ... बैलगाडा शर्यत यावर लेखक-दिग्दर्शक मकरंद शशिमधु माने यांनी 'खिल्लार' या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा आम्ही भाग आहोत याचा आम्हाला आनंद आहे."

मकरंद माने यांनी दिग्दर्शित 'रिंगण' हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यानंतर मकरंद यांनी यंग्राड, कागर, सोयरीक, पोरगं मजेतंय असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मुळचे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने मकरंद यांनी बैलगाडा शर्यतींचं वातावरण अतिशय जवळून पाहिले आहे. त्यामुळेच आता हा विषय ते 'खिल्लार' चित्रपटातून मांडत आहेत. रिंकू राजगुरूने त्यांच्या 'कागर' या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्यामुळे मकरंद आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. तर मकरंद आणि रिंकू यांच्याबरोबर ललित प्रभाकर पहिल्यांदाच काम करत आहे.

चित्रपटाविषयी मकरंद माने म्हणाले, "बैलगाडा शर्यतीचा विषयच अगदी जिव्हाळाचा आहे. महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ पडद्यावर रंगवताना 'खिल्लार'मधून मैदान जोरदार रंगणार माझी खात्री आहे."

न्युक्लिअर अ‍ॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे 'खिल्लार' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित झालेली नाही. पण पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.