आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक सोमवारी घटना घडली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आले नसले तरी नैराश्येतून विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शीतल आमटे यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जातोय. गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट टाकत शीतल आमटे यांच्या आत्महत्येबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘ताण..मनावर..कोणाचा? परिस्थितीचा? माध्यमांचा? चर्चेचा? एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेली. नि:शब्द झालोय.. शीतल आमटे.. का गं?,’ असा सवाल त्यांनी केला आहे.
आमटे कुटुंबातून आलेली पहिली प्रतिक्रिया
डॉ. शीतल आमटे आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. दिवंगत बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. या घटनेबद्दल आमटे कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे म्हणाले, 'आमच्यासाठी हे सर्व खूप धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण धक्क्यात आहोत. सध्या काहीही सांगण्याच्या मन:स्थितीत नाही.' दरम्यान कौटुंबिक कलह आणि संस्थेतील वादामुळे डॉ. शीतल आमटे या गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
आमटे कुटुंबातील वाद...
2016 मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आणि यात डॉ. शीतल आमटे-कराजगी आणि त्यांचे पती गौतम कराजगी यांना पद देण्यात आले. यादरम्यान कौस्तुभ आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या सहसचिवपदाचा राजीनामा दिला. डॉ. शीतल आमटे-कराजगी आनंदवनात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत होत्या. त्यांचे पती गौतम-कराजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, गौतम कराजगी आनंदवनाच्या कामकाजात एखाद्या व्यावसायिक कंपनीसारखे व्यवहार आणण्याचा प्रयत्न करत होते. यामुळेच आमटे कुटुंबात वादाची ठिणगी पडली.
यानंतर डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी सोमवारी 20 नोव्हेंबर 2020 रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमटे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. शीतल यांनी सख्खा भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक आरोप केले. परंतू, एका तासानंतर शीतल यांनी तो फेसबुकवरील लाईव्ह व्हिडीओ काढून टाकला. यानंतर आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदन जाहीर करत डॉ. शीतल आमटे यांचे आरोप फेटाळून लावले होते. यानंतर आज डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले यामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.