आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग अपडेट:‘दख्खनचा राजा ज्योतिबा’मध्ये समर्थ पाटील साकारणार ज्योतिबाचं बालरुप, मालिकेत बघायला मिळणार ज्योतिबाच्या बालपणापासूनची कथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु होत आहे.

छोट्या पडद्यावर 23 ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्र सप्तमीपासून सुरु होणाऱ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दख्खनच्या राजाचा महिमा सांगणाऱ्या या पौराणिक मालिकेत ज्योतिबाच्या बालपणापासूनची कथा पाहायला मिळणार आहे. बालकलाकार समर्थ पाटील ज्योतिबाचं बालरुप साकारणार आहे.

समर्थ मुळचा कोल्हापुरातील सरवडे गावचा. ज्योतिबा हे त्याचं कुलदैवत. त्यामुळे लहानपणापासूनच ज्योतिबावर त्याची श्रद्धा आहे. याच दैवताचं बालरुप साकारायला मिळणं हा ज्योतिबाचा आशिर्वाद असल्याचं समर्थ म्हणाला.

''मी या भूमिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. कोल्हापुरात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेचं शूट होणार असल्याचं मी ऐकलं होतं. मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा मला खूप आनंद झाला. सेटवर आम्हा सर्वांचीच काळजी घेतली जातेय. निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि सहकलाकार सर्वच जण मला या नव्या भूमिकेसाठी खूप मदत करत आहेत. घोडेस्वारी मी शिकलो आहे ज्याचा या भूमिकेसाठी मला उपयोग होईल. फावल्या वेळात मी सेटवर त्याचा सरावही करत असतो,'' असे समर्थने सांगितले.

महाराष्ट्राच्या या दैवताची गोष्ट 23 ऑक्टोबरपासून सायंकाळी 6.30 वाजता ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’मध्ये प्रेक्षकांना बघता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...