आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका लोकप्रिय आहे. मालिकेतील मोरे कुटुंब प्रेक्षकांना आपल्यातीलच वाटते. आता मालिकेसंदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. मालिकेतील एका प्रमुख कलाकाराने मालिका सोडत असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर मालिकेतील सरिता वहिनींनी त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत वैभवची भूमिका साकारणारा अभिनेता अमेय बर्वे याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतून अमेय घराघरात पोहचला आणि लोकप्रिय झाला. अमेयने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकर हिने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना नंदितानं अमेयबरोबरच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नंदिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, "अम्या... हक्काने भांडणारा, हट्ट करणारा, मस्का मारणारा, खोड्या काढणारा... जगातला आगाऊ माणूस आहेस तू. जिकडे जाशील तिकडे माणसं जोडतोस, इतका जीव लावतोस की तू जाताना लोकं नुसती रडारड करून हैराण. तुझी स्टाईल, तुझा अॅटिट्यूड, तुझा वावर सगळ्यांना हवाहवासा वाटणारा. तुझी विनोदाची उत्तम जाण आहे त्यामुळेच तुझ्यावर कितीही राग आला तरी तू समोरच्याला हसायला भाग पाडणारा आहेस. किती सवय लावली आहेस यार तू आम्हा सगळ्यांना. लॉकडाऊन, कोविड सण, वाढदिवस, ब्रेकअप, गेट टू गेदर, वाद, टीआरपी, नाईट ड्युटी, चांगले दिवस, वाईट दिवस आपण सर्वकाही एकत्र साजरे केले. आता तुझ्याशिवाय खूप कठीण जाईल. तू कुटुंबातील सर्वात सक्षम सदस्य आहेस."
पोस्टच्या शेवटी नंदिताने लिहिले, "हम तुम्हे भुला दे ये मुमकीन नहीं और तुम हमें भुल जाओ, ये हम होने देंगे नहीं, जा भिडू जी ले अपनी जिंदगी. जिथे तू जाशील तिथे तू चमकत राहशील. जा आणि तुझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न कर. तुझ्यात असलेली चमक कायम ठेव. तुला कायम खूप खूप प्रेम, तुझी खूप आठवण येईल. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा." या पोस्टमध्ये नंदिताने मालिकेतील कलाकार सुनिल बर्वे, आकाश नलावडे, आकाश शिंदे, कोमल कुंभार आदी कलाकारांना टॅग केले आहे.
अमेय बर्वेने छोट्या पडद्यानंतर अलीकडेच मोठ्या पडद्यावरही पदार्पण केले आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' या चित्रपटात तो झळकला आहे. या चित्रपटात त्याने ललित प्रभाकर साकारत असलेल्या सनी या मुख्य पात्राच्या बेस्ट फ्रेंडची भूमिका साकारली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.