आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद शमला:‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या वादावर अखेर तोडगा; "ज्योतिबाचा इतिहास कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही" - महेश कोठारेंचे गावकऱ्यांना आश्वासन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेसंदर्भातील वादावर अखेर तोडगा निघाला आहे.

अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’च्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेसंदर्भातील वादावर अखेर तोडगा निघाला आहे. मुंबईत या मालिकेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यातून सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता. मालिका ही पौराणिक व केदार विजय ग्रंथ यानुसार असावी अशी गावकऱ्यांची मागणी सुरुवातीपासूनच सुरू होती. यासाठी गावकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्याकडे धाव घेत याप्रकरणी मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 18 नोव्हेंबर रोजी राजगड मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीच्या चर्चेअंती महेश कोठारे यांनी गावकऱ्यांच्या भावना समजून घेत, त्यांना ग्वाही दिली की, “ज्योतिबाचा इतिहास कुठेही चुकीचा दाखवला जाणार नाही, तसेच भविष्यात जे काही वाहिनीवर दाखवले जाईल त्याच्यात कोणतेही आक्षेपार्ह ऐतिहासिक चित्रण नसेल.”

यासोबतच गावकऱ्यांनीही समजुतीपणा दाखवत मालिकेच्या चित्रीकरणाला कोणताही विरोध गावाकडून केला जाणार नाही आणि शूटिंग व्यवस्थित पार पडेल असा शब्द महेश कोठारे यांना दिला आहे.

काय होता संपूर्ण वाद?
अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’ने 23 ऑक्टोबरपासून ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. पौराणिक मालिकेच्या या कथानकावर ज्योतिबा ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता. या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता या मालिकेच्या चित्रीकरणावर बंदी आणा अन्यथा उद्रेक होईल, वाडीरत्नागिरी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे हा इशारा दिला होता. ‘कोठारे प्रॉडक्शन’चे सर्वेसर्वा महेश कोठारे यांनी मालिकेत चुकीचा इतिहास दाखवून दिशाभूल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. इतकेच नाही तर या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ग्रामपंचायतीकडून परवानगीही घेतली नसल्याचेही त्यांचे म्हणणे होते. शिवाय मालिकेचे कथानक केदार विजय ग्रंथानुसार बदलले गेले, तरच चित्रीकरणाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ज्योतिबा ग्रामस्थांनी केली होती.

कोल्हापुरात सुरु आहे मालिकेचे चित्रीकरण
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ म्हणजे महाराष्ट्राचं लोकदैवत. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भक्त आपल्या लाडक्या दैवताला साकडं घालतात. ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि त्यांच्या टीमने मालिकेचा सेट उभारला आहे. यामध्ये ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे. डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे हे या मालिकेचे तज्ज्ञ सल्लागार आहेत. त्यांची मराठी विषयात पीएचडी झालेली आहे. संशोधक आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात ते परिचित आहेत. मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे असून अविनाश वाघमारे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...