आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मे रोजीच्या कार्यक्रमात निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र सामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनीच विरोध दर्शवल्यानंतर 5 मे रोजी त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. राजकारणातील या महत्त्वाच्या उलथापालथीदरम्यान शरद पवार यांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासोबत थिएटरमध्ये जाऊन 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट बघितला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी राज्यभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
शरद पवार यांनी मुंबईत चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला. शरद पवार यांच्या लेक आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत पवारांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्याची माहिती दिली. यावेळी शरद पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड देखील होते. शरद पवार यांनी चित्रपट पाहिल्यानंतर शाहीरांचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे, चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अंकुश चौधरी, सना शिंदे, बेला शेंडे यांची भेट घेत त्यांच्याशी संवाददेखील साधला.
सुप्रिया सुळे यांनी शेअर केला व्हिडिओ
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शरद पवार यांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, "आदरणीय पवार साहेब यांनी नुकताच शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट शाहीर साबळे यांची कथा तर मांडतोच पण सोबतच महाराष्ट्राचा इतिहास देखील सांगतो. हा अतिशय सुंदर चित्रपट असून आपणही अवश्य पाहावा," असे त्या म्हणाल्या आहेत.
चित्रपटाने सहा दिवसांत केली कोट्यवधीची कमाई
'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासून चांगली कमाई करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या मराठी चित्रपटाने 0.3 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली. या चित्रपटाने 0.55 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी 0.8 कोटी कमावले. चौथ्या दिवशी अर्थात 'महाराष्ट्र दिना'च्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली. या चित्रपटाने एका दिवसात 1.03 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी 0.34 कोटी आणि सहाव्या दिवशी 0.31 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे रिलीजच्या सहा दिवसांत या चित्रपटाने 3.33 कोटींचा गल्ला जमवला आहे.
शाहीर साबळे यांचे नातू आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदेने या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. अजय-अतुल यांनी या चित्रपटातील गाण्यांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.