आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लतादीदींना सावरकरांच्या संघटनेत व्हायचे होते सहभागी:सावरकरांनी दिला होता नकार; शरद पोंक्षेंचे लता मंगेशकर यांच्याबद्दल वक्तव्य

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते शरद पोंक्षे हे एक उत्तम वक्तेदेखी आहेत. अभिनयाव्यतिरिक्त ते व्याख्यानही देतात. त्यांच्या व्याख्यानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओत त्यांनी दिवंगत गायिका लता मंगेशकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील संवादाचा एक किस्सा शेअर केला आहे. लतादीदींना सावरकरांच्या अभिनव भारत संघटनेत सहभागी व्हायचे होते, पण सावरकरांनी त्यांना त्यासाठी नकार देत गाणी गाऊन देशसेवा करण्यास सांगितले, असे पोंक्षे यांनी त्यांच्या व्हिडिओत म्हटले आहे.

शरद पोंक्षे व्हिडीओत म्हणतात, ''एकदा लता मंगेशकर सावरकरांना म्हणाल्या, मला तुमच्या अभिनव भारत संघटनेमध्ये यायचे आहे, क्रांतीकार्यात सहभागी व्हायचे आहे. यावर सावरकर म्हणाले, वेडी आहेस का तू? तुला परमेश्वराने गाणे दिले आहे. अतिशय उत्तम गळा दिलाय. साक्षात सरस्वती तुझ्या गळ्यात आहे. प्रत्येकानं क्रांती केलीच पाहिजे अन् ती हातात शस्त्र घेऊनच केली पाहिजे असा फार चुकीचा समज आहे. क्रांती फार वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. तू अजिबात आमच्या अभिनव भारत संघटनेत येऊ नकोस, स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस. तुला जे दिलंय परमेश्वराने त्याचा वापर कर आणि हिंदुस्थानातील लोकांना तुझ्या गाण्यातून आनंद देण्याचे काम कर. तुझ्या गाण्याने देशाची सेवा कशी करता येईल याचा विचार कर. त्यानंतर लताबाईंनी फक्त या हिंदुस्तानालाच नाही तर संपूर्ण जगाला आपल्या स्वरांनी आनंद दिला," असे शरद पोंक्षेंनी म्हटले.

शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते नेहमीच सावरकरांच्या विचारांनी प्रेरणा घेत बोलतात.

बातम्या आणखी आहेत...