आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. पोलीसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्या गुन्ह्याची रोमांचक रीतीने उकल करून सांगणारी ही कथामालिका असेल. या मालिकेत अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पीआय मोक्षदा मनोहर मोहिते ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'संगीत देवबाभळी' या नाटकाद्वारे शुभांगी घराघरात पोहोचली आहे. त्यामुळे ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतील मोक्षदा या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी आशा तिला आहे.
मुळची नाशिकची असलेली शुभांगी आपल्या या नव्या भूमिकेविषयी सांगताना म्हणाली, ‘मोक्षदा मोहिते असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. ती प्रत्येक प्रसंगांचा, घटनेचा आणि गुन्ह्यांचा सगळ्या बाजूने विचार करते आणि मगच तिचं मत मांडते. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तिच्या मनात प्रचंड राग आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये तिची दहशत आहे. खऱ्या आयुष्यातही जर अन्यायाचा प्रसंग माझ्यासमोर उभा ठाकला तर माझ्यातली मोक्षदा जागी होते.'
ख-या आयुष्यात अलीकडेच घडलेला एक प्रसंग सांगताना शुभांगी म्हणाली, 'अगदी आठ दिवसांपूर्वीचाच प्रसंग सांगायचा तर शूटिंग संपवून उशिरा मी घरी येण्यासाठी रिक्षा बुक केली. त्या रिक्षावाल्याने मला जवळपास एक तास चुकीच्या दिशेने फिरवलं. मी त्याला त्याच्या चुकीची जाणीव करुन देण्यासाठी रौद्ररुप धारण केलं आणि त्याला पैसेच दिले नाहीत. त्या रिक्षावाल्यासाठी हा कायम स्मरणात राहणारा धडा असेल. अशा परिस्थितीत घाबरुन न जाता धैर्याने सामना करायला हवा असं मला वाटतं. मोक्षदा ही व्यक्तिरेखा मनाला खूपच भावणारी अशी आहे. पोलिसांविषयी माझ्या मनात आदर होताच ही मालिका करताना हा आदर आणखी वाढला आहे. वर्दीची खरी किंमत जेव्हा ती शूटिंगच्या निमित्ताने आम्ही धारण करतो तेव्हा कळते. पोलिसांच्या मेहनतीची आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते. नवे लक्ष्यच्या प्रोमोजना भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे याचा आनंद होतोय.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.