आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी स्मिता आता होणे नाही...:डिलिव्हरीनंतर वारंवार येणा-या तापाकडे केले होते स्मिताने दुर्लक्ष, नेहमी म्हणायच्या मी अल्पायुषी आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्या कायमच्या या जगातून निघून गेल्या.

जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा उल्लेख होईल, तेव्हा स्मिता पाटीलचं नाव अग्रस्थानी असेल. वयाच्या अवघ्या 31 व्या जगाचा निरोप घेतलेल्या या उमद्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती. आज (17 ऑक्टोबर) या अभिनेत्रीचा जन्मदिवस. स्मिता आज हयात असत्या तर त्यांनी वयाची 65 वर्षे पूर्ण केली असती. पण नशीबाचा खेळ बघा, वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्या कायमच्या या जगातून निघून गेल्या.

स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अभिनय केलेले 14 चित्रपट प्रदर्शित झाले. 'गलियों के बादशाह' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. व्यावसायिक आणि समांतर अशा दोन्ही चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात स्मिता पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते, तर त्यांची आई समाजसेविका होती. 16 व्या वर्षी त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली होती.

स्मिता पाटील यांनी विवाहित राज बब्बरची जोडीदाराच्या रुपात निवड केली होती. वयाच्या तिशी ओलांडण्यापूर्वी आई होण्याची त्यांची इच्छा होती. लेखिका ललिता ताम्हणे यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत स्मिता पाटील यांच्याविषयीच्या ब-याच गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यांनी स्मितावर 'स्मिता स्मितं आणि मी' हे पुस्तक लिहिले आहे. ललिता ताम्हणे आणि स्मिता पाटील या दोघी मैत्रिणी होत्या.

नूतन आणि स्मिता पाटील यांची शेवटची भेट..
मुलाखतीत ललिता यांनी नूतन आणि स्मिता पाटील यांच्याविषयीचा एक किस्सा सांगितला होता. स्मिता नूतन यांचा खूप आदर करायची. ललिता ताम्हणे यांनी सांगितल्यानुसार, "स्मिता नूतन यांना खूप मान देत होती. दोघींची फक्त कामाच्या निमित्तानेच भेट व्हायची. वैयक्तिक कधी भेटीगाठी झाल्या नव्हत्या. त्याकाळात नूतन एक चित्रपट दिग्दर्शित करणार होत्या आणि स्मिता पाटीलची त्या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. प्रतिकच्या जन्मानंतर नूतन स्मिता यांना भेटायला ब्रीच कँडी रुग्णालयात गेल्या होत्या. त्यावेळी नूतन यांना बघून स्मिताचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तीच स्मिता आणि नूतन यांची शेवटची भेट ठरली होती."

वारंवार येणा-या तापाकडे केले होते दुर्लक्ष...
स्मिता यांनी 28 नोव्हेंबर 1986 रोजी मुलगा प्रतिकला जन्म दिला. प्रतिकच्या जन्माच्या अवघ्या 15 दिवसांतच स्मिता यांचे निधन झाले होते. याविषयी ललिता ताम्हणे यांनी मुलाखतीत सांगितले होते, "प्रतिकला घरी आणल्यानंतर स्मिताला वारंवार ताप येत होता. तेव्हा स्मिताने मला फोनवर ताप येत असल्याचे सांगितले होते. ताप अंगावर काढू नकोस, असे मी तिला सांगितले होते. ते आमचे शेवटचे बोलणे ठरले. बाळाकडे दुर्लक्ष नको व्हायला, म्हणून स्मिताने ताप अंगावर काढला आणि स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दिले नाही."

असा झाला स्मिताचा मृत्यू...
दोन तीन दिवसांतच स्मिता यांची प्रकृती चिंताजनक झाली. व्हायरल इन्फेक्शनमुळे स्मिता यांच्या मेंदूला संसर्ग झाला होता. आजारपण वाढताच त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा एक-एक अवयव निकामी होत गेला. मला स्मिताच्या तब्येतीविषयी कळताच मी तिच्या घरी पोहोचले. तिची आई अतिशय खचून गेली होती. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले होते. 13 डिसेंबरच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास दिप्ती नवलने फोन करुन स्मिता गेल्याचे मला कळवले होते.

स्मिता नेहमी म्हणायच्या मी अल्पायुषी आहे...
ललिता ताम्हणे यांनी मुलाखतीत सांगितल्यानुसार, स्मिता कायम स्वतःला अल्पायुषी असल्याचे म्हणत असे. "एकदा स्मिता महेश भट यांना म्हणाली होती, की माझी लाइफलाइन खूप लहान आहे, मी फार काळ जगणार नाही."

झाला होता मृत्यूचा भास...
विशेष म्हणजे गर्भवती असताना स्मिताला स्वप्नात उडणारे हनुमान दिसले होते. या स्वप्नामुळे स्मिता घाबरल्या होत्या. हनूमान मला लवकरच सोबत घेऊन जातील, असे स्मिता म्हणाल्या होत्या. दुर्दैवाने स्मिताला झालेला मृत्यूचा भास खरा ठरला आणि काही महिन्यांतच मुलाच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला."

अंत्यसंस्काराला नादिरा बब्बर यांनी लावली होती हजेरी...
राज बब्बर यांनी स्मितासोबत लग्न केले तेव्हा ते विवाहित आणि दोन मुलांचे वडील होते. नादिरा बब्बर हे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. तर आर्य बब्बर आणि जुही बब्बर ही त्यांच्या मुलांची नावे आहेत. स्मिता पाटील यांच्या अंत्यसंस्काराला नादिरा बब्बर यांनी हजेरी लावली होती. त्या मुलांसोबत यावेळी हजर होत्या. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर नादिराकडे परतले होते.

बातम्या आणखी आहेत...