आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'रात्रीस खेळ चाले 2' मधील शेवंता या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. शेवंताच्या अदांवर संपूर्ण महाराष्ट्र भाळला होता. मालिका संपल्यापासून प्रेक्षक शेवंताला खूप मिस करत आहेत. पण आता शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत पुनरागमन करणार आहे. झी युवावर येत्या 4 नोव्हेंबरपासून 'तुझं माझं जमतंय' ही विनोदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या मालिकेत अपुर्वा पम्मी या वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे आणि तिच्या सोबतच अभिनेता रोशन विचारे आणि अभिनेत्री आसावरी भरती भानुदास या मालिकेत प्रमुख भूमिका निभावणार आहेत. या मालिकेचा भन्नाट प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला, ज्यात पम्मीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
सोशल मीडियावरदेखील प्रेक्षकांनी या प्रोमोला उदंड प्रतिसाद दिला. पण काही नेटिझन्सनी अपुर्वाला या प्रोमोवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अपुर्वाने शांत न बसता त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.
प्रोमो पाहून एका नेटिझनने तुमचा लुक पाहता सगळे सिरियलवाले तुम्हाला बाहेरवालीचाच रोल देतात का? अशी कमेंट केली. त्यावर अपुर्वाने, "या सिरियलचा एकही एपिसोड टेलिकास्ट पण नाही झाला, तुम्ही आधीच ठरवून टाकलंत?" असं म्हणत त्या ट्रोलरची बोलती बंद करून टाकली.
तसंच त्या ट्रोलरच्या सोशल मीडियावरील यूजरनेमवर निशाणा साधत अपुर्वा म्हणाली की, "आणि मुळात कसंय, इनोसंट बॉय नाव ठेवून तुम्ही पण इनोसंट होत नाही ना."
अपुर्वाच्या या बिनधास्त आणि निर्भीड स्वभावाच्याच चाहते प्रेमात आहेत. आता अपुर्वाची नवीन व्यक्तिरेखा पम्मीदेखील अशीच बिनधास्त आणि निर्भीड असणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.