आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पडद्यावरील प्रेमळ आईचा आज वाढदिवस:सुलोचना दीदींनी 'या' चित्रपटात साकारली होती पहिल्यांदा आईची भूमिका, म्हणाल्या होत्या - तीन अभिनेत्यांची आई साकारणे खूप अवघड

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री सुलोचना दीदी यांचा आज 92 वा वाढदिवस.
Advertisement
Advertisement

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सोज्वळ, निरागस अभिनयाद्वारे लाखो चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचा आज 92 वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कारकीर्दीविषयी जाणून घेऊया..

अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी बेळगावमध्ये चिकोडी तालुक्यातील खडकलरत गावी झाला. त्यांनी 1943 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. भालजी पेंढारकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात विविधांगी भूमिका केल्या. चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांच्या विशेषत: ‘आई’च्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.

सुलोचना दीदींची प्रतिमा आजही लाखो सिनेरसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि प्रेमळ आई त्यांनी पडद्यावर उत्तमपणे वठवली. 1953-54 मध्ये सुलोचना यांचे ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ हे सिनेमे खूप गाजले. त्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावतच गेला. ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर सिनेमे ठरले.

  • हिंदी सिनेसृष्टीतही उमटवला ठसा

मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांचा मोतीलाल यांच्या बरोबरचा ‘मुक्ती’ हा चित्रपटही गाजला. त्यानंतर त्यांनी सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर, नाजिर हुसैन, अशोक कुमार यांच्या सोबतही काम केले. नायिका म्हणून त्यांनी 30 ते 40 चित्रपट केले असतील.

‘दिल देके देखो’ या 1959 मधील सिनेमात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली. त्यानंतर 1995 पर्यंत त्यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांच्या ‘आई’ची भूमिका वठवली. मराठीत त्यांनी 50, तर हिंदीत 250 सिनेमे केले. सुलोचना दीदींना 1999 मध्ये ‘पद्मश्री’, तर 2009 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

  • तीन अभिनेत्यांची आई साकारणे खूप अवघड

तीन अभिनेत्यांची आई साकारणे खूप आवडल्याचे सुलोचना दीदी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते तीन अभिनेते सुनील दत्त, देव आनंद आणि राजेश खन्ना होते. हिंदी सिनेमात त्या सुनील दत्त यांच्या आईच्या भूमिकेत किंवा नात्यात हमखास दिसायच्या. त्यांच्या ‘हिरा’, ‘झुला’, ‘एक फूल चार कांटे’, ‘सुजाता’, ‘मेहरबान’, ‘चिराग’, ‘भाई-बहन’, ‘रेशमा और शेरा’ आदी चित्रपटांत त्यांनी आईची भूमिका साकारली. ‘जब प्यार किसीसे होता है’, ‘प्यार मोहब्बत’, ‘दुनिया’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘अमिर गरीब’ तर राजेश खन्नांंच्या ‘बहरों के सपने’, ‘डोली’, ‘कटी पंतग’, ‘दिल दौलत दुनिया’, ‘प्रेमनगर’मध्येही आईची भूमिका साकारली.

Advertisement
0