आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आपले सैन्य दल हा आपला अभिमान बिंदू आहे. लष्करी खात्याची कामगिरी नेहमीच वाखाणण्याजोगी असते. आजतागायत आपल्या सैनिक बांधवांनी देशासाठी दिलेले बलिदान आणि देशाच्या हितासाठी कायम केली जाणारी धडपड याचा विचारच आपली मानसिकता बदलवून टाकतो. अशाच काही विचारसरणीवर आधारित आणि सबंध सैनिक बांधवांना समर्पित पहिली मराठी लष्करी ऍक्शन फिल्म आपल्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.
लेखक, दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात लिखित, दिग्दर्शित 'स्पेशल' चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. पोस्टर प्रदर्शनादरम्यान आमदार संजय केळकर (ठाणे शहर) आणि चित्रपटातील कलाकार मंडळी, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर टीम यांची उपस्थिती होती.
'स्वप्न स्वरूप' निर्मित आणि 'शिव ब्रह्मांड' सहनिर्मित या चित्रपटाची लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सचिन आंबात यांनी सांभाळली. 'स्पेशल' चित्रपटातून अभिनेता सुयोग गोऱ्हे आणि अभिनेत्री पायल कबरे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'शेंटिमेंटल', 'सातारचा सलमान', 'सिनियर सिटीझन', 'आम्ही बेफिकीर' यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकरल्यानंतर सुयोग स्पेशल या चित्रपटातून एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकारणार आहे. तर पायल कबरेची या चित्रपटातील भूमिका चित्रपटाच्या नावाप्रमाणेच स्पेशल आहे. पायलने अभिनेते अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेतून अभिनयाचे धडे घेतले आहेत. या चित्रपटातून पायल मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे आणि म्हणूनच तिच्यासाठी हा चित्रपट नक्कीच स्पेशल असणार आहे.
या चित्रपटात सुयोग 'समर नाईक' आणि पायल 'भूमी राठोड' नामक पात्रे साकारणार आहेत. आणि ही दोन्ही पात्रे लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. देशाच्या हिताचे एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर आणि भूमीची लढाई या चित्रपटाच्या प्रवासात पाहायला मिळणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.