आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहिल्या सीझननंतर आता प्रेक्षकांनी ‘समांतर’च्या दुसऱ्या सीझनलासुद्धा भरभरून प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत या सीरिजला 56 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘एमएक्स प्लेयर’वर अलीकडेच ही वेब सीरिज सुरु झाली. या वेब सीरिजची निर्मिती जीसिम्सची असून या कंपनीचे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे आहेत. ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. नितीश भारद्वाज, स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी या वेब सीरिजला दर्जा मिळवून दिला आहे. या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागामध्ये सई ताम्हणकरसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहे.
“समांतर-2’ला भरभरून यश मिळणार याबाबत आम्हाला खात्री होती, कारण यातील सर्वच गोष्टी अचूकपणे जुळून आल्या आहेत. दुसऱ्या भागाला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्याने मला खूप आनंद झाला आहे. मला याचाही आनंद आहे की मी माझ्या करिअरमध्ये जे नवीन प्रयोग करत आहे त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या सर्व यशाचे श्रेय खासकरून निर्माते अर्जुन आणि कार्तिक यांना तसेच दिग्दर्शक समीर विद्वांस यांना आहे. त्यांनी सर्जनशिलतेच्या बाबतीत जे श्रम घेतले आणि चित्रीकरणाच्या बाबतीत जो दर्जा सांभाळला त्याला तोड नाही,” अशा शब्दांत स्वप्निल जोशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या मालिकेत त्याने कुमार महाजन ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे.
स्वप्निलने पहिल्या सीझनच्यावेळी ‘समांतर’ची संपूर्ण टीम कोल्हापूर येथे आलेल्या पुरामध्ये 13 दिवस कशी अडकून पडली होती, याची आठवण सांगितली आहे. “कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात ऑगस्ट 2019 मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. संपूर्ण जिल्हे जलमय झाले होते. आम्ही तेव्हा ‘समांतर-1’चे चित्रीकरण कोल्हापूर येथे करत होतो. या पुराचा कहर एवढा मोठा होता की संपूर्ण चमू तब्बल 13 दिवस एका हॉटेलमध्ये अडकून पडला होता. त्यावेळी अर्जुन आणि कार्तिक यांनी संपूर्ण चमूची काळजी घेत आम्हा कोणालाही कशाचाही त्रास होणार नाही, असे पहिले. ते दिवस विसरता येण्यासारखे नाहीत. आज चित्रिकरणादरम्यान जेव्हा कधी त्या दिवसांची आठवण होते, तेव्हा अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो.”
स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज यांना एकत्रित या वेब सीरिजमध्ये आणण्याच्या आपल्या निर्णयाबद्दलही निर्मात्यांनी खुलासेवार सांगितले. “जगभरात या दोघांना त्यांनी दोन वेगळ्या मालिकांमध्ये केलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी ओळखले जाते. ‘समांतर’च्या माध्यमातून या दोन प्रतिभावान कलाकारांना समोरासमोर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा सई ताम्हणकरची सुंदरा व मिराच्या व्यक्तिरेखांसाठी निवड केली तेव्हा अनेक नावे आम्हाला सुचवली गेली होती. परंतु आम्ही सईच्या नावावर ठाम होतो. आम्हाला माहित होते की, सुंदराच्या व्यक्तिरेखेला केवळ तीच न्याय देऊ शकेल.”
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.