आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी फिल्मचे मोशन पोस्टर:'बळी'चे मोशन पोस्टर रिलीज,  पोस्ट शेअर करत स्वप्नील जोशी म्हणतो - 'धोका कोणत्याही कोपऱ्यातून होऊ शकतो'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘बळी’ हा चित्रपट 16 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होतोय.

अभिनेता स्वप्नील जोशी स्टारर बळी या हॉरर धाटणीच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. यासोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट यावर्षी 16 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तीचा भीतीदायक चेहरा दिसत असून त्याच्या चेह-यावर रक्त आणि डोळ्यांत क्रॉसच्या प्रतिमा दिसत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरुनअघटीत आणि भितीपूर्ण वातावरणाचे सुतोवाच होते. त्यातून या चित्रपटाची कथा आणि पटकथा भीतीदायक असेल, याची कल्पना येते.

स्वप्नील जोशीने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करुन, धोका कोणत्याही कोपऱ्यातून होऊ शकतो असे म्हटले आहे. 'एलिझाबेथ कोणत्याही कोपऱ्यातून येऊ शकते. सावध राहा. आता कोण ठरणार तीचा 'बळी'? 'बळी', लवकरच येत आहे,' असे कॅप्शन स्वप्नीलने दिले आहे.

या चित्रपटाबद्दल स्वप्नीलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणतो, “यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन, असे आश्वासन गेल्यावर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो. ते करत असताना कार्तिक, अर्जुन यांच्यासारखे माझे आवडते निर्माते मला मिळाले आणि त्याचवेळी माझा लाडका दिग्दर्शक विशाल हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो. आणि त्याचा प्रेक्षक चांगलाच आनंद घेतील.”

स्वप्नील पुढे म्हणतो, “जर तुम्ही थोडेसा मागे जाऊन विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की मराठी चित्रपट क्षेत्राने ‘लपाछपी’च्या आधी कधीही हॉरर चित्रपटाचा प्रयोग केलेला नाही. हॉरर विनोदी चित्रपटांचे प्रयोग झाले, पण तुमची झोप उडवेल असा मराठी चित्रपट झाला नाही. मला वाटते ‘बळी’ ती पोकळी नक्कीच भरून काढेल. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे चित्रपटाची कथा तुम्हाला घाबरवून टाकते. नेहमी ज्याप्रमाणे भारतीय हॉरर चित्रपटांमध्ये होते तसे भडक संगीत आणि उड्या मारून भीती निर्माण करण्याचा प्रकार येथे नाही.”

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल फुरिया म्हणाले, “लपाछपी’ला मराठी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना हॉरर चित्रपट आवडतात, हे दाखवून दिले. त्यांच्या या प्रतिसादाला दाद म्हणून मी मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट बनवित राहायचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. ‘बळी’ हा ‘लपाछपी’पेक्षाही अधिक भीतीदायक आणि थ्रिलिंग असेल, अशी हमी मी प्रेक्षकांना देवू शकतो,” असे ते म्हणाले आहेत.

या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे असून स्वप्नील जोशी आणि पूजा सावंत यात महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सने केली आहे. या कंपनीने यापूर्वी ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-1’ आणि ‘समांतर-2’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आले होते.

बातम्या आणखी आहेत...