आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी 'KBC'च्या मंचावर मायलेकीची जोडी:'बाजिगर'च्या सेटवर काजोलवर का ओरडला होता शाहरूख, आठवणींचा खजिना उलगडणार तनुजा-काजोल

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच विशेष अतिथी म्हणून काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची हजेरी

'कोण होणार करोडपती' या मराठी कार्यक्रमाचा नवा सीझन 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेते सचिन खेडेकर यंदाही या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सुरु झाला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष पाहुणे म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि त्यांची लाडकी लेक-अभिनेत्री काजोल ही मायलेकींची गोड जोडी उपस्थित राहणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पहिल्यांदाच या दोघींमधला अनोखा बंध पाहायला मिळणार आहे. या दोघी जणी 'एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर' (ADAPT) या संस्थेसाठी 'कोण होणार करोडपती' हा खेळ खेळणार आहेत. येत्या 11 जून रोजी हा विशेष भाग प्रसारित होणार आहे.

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या शनिवारच्या पहिल्याच विशेष भागात मायलेकींचे हळुवार बंध, काजोलच्या नावाची गंमत, काजोलच्या लहानपणीचे किस्से अशा अनेक किश्शांचा उलगडा या भागात सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधताना होणार आहे. तनुजा आणि काजोल यांच्याबरोबर काजोलचा मित्र लेखक, दिग्दर्शक निरंजन अय्यंगार आणि तनुजा यांची मैत्रीण ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर हेही या भागात उपस्थित असणार आहेत.

या खास भागांचे काही व्हिडिओ सोनी मराठी वाहिनीने रिलीज केले आहेत. यापैकी एका व्हिडिओत काजोलने एक खुलासा केला. तिने सांगितल्यानुसार, तिला कधीच अभिनेत्री व्हायचे नव्हते, तर नोकरी करायची इच्छा होती. पण ती अभिनय क्षेत्रात आली. स्वतः काजोलने या विशेष भागाचे काही खास व्हिडिओ स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत.

याशिवाय काजोलला 'बाजिगर'च्या सेटवर शाहरूख खान का ओरडला होता, काजोलचा पहिला चित्रपट बघताना तनुजा यांनी तिचा हात घट्ट का धरून ठेवला होता, तनुजा यांच्या 'लग्नाची बेडी' या नाटकाचे अनुभव; अशा अनेक उत्कंठावर्धक गोष्टींनी हा विशेष भाग रंगलेला असल्याने प्रेक्षकांसाठी विशेष पाहुण्यांचा सहभाग असलेला हा पहिला विशेष भाग निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी या पर्वातील पहिल्याच विशेष भागात तनुजा आणि काजोल यांना खुबीने बोलतं केलं आहे. लहानपणीची मस्तीखोर काजोल आईला का घाबरते, तनुजा यांना गुजराती, जर्मन, बंगाली इत्यादी दहा भाषा अस्खलित कशा काय बोलता येतात, त्यांना भाषांची आवड कशी निर्माण झाली, काजोल सेटवर धडपडली की पिक्चर हिट होतो, अशी अफवा सिनेमाक्षेत्रात अनेक वर्षे आहे; त्यामध्ये कितपत तथ्य आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पहिल्याच विशेष भागात मिळणार आहेत. येत्या 11 जून रोजी रात्री 9 वाजता या खास भागाची ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...