आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीझर रिलीज:राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'भोंगा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, भोंग्याचा आणि धर्माचा काही संबंध असतो का? येत्या 24 सप्टेंबरला समजणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली. हल्लीच चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून या पार्श्वभूमीवर हा 'भोंगा' चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून टीझर मध्ये दाखवल्याप्रमाणे धर्मापेक्षा मोठं कोणी नाही मग कोणाच्या जीवाला धोका असला तरी चालेल या वृत्तीला दडपून टाकण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न दाखवण्यात आले आहेत.

आपलं ते खरं करण्याची मानवी वृत्ती अशा या समस्यांना दुजोराच असल्याने बऱ्याचदा काही अनपेक्षित घटना डोळ्यसमोर घडताना दिसतात. असाच आशयघन विषय या 'भोंगा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'भोंगा' चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. या कुटुंबातील नऊ महिन्याच्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. या आजाराला उच्च ध्वनीचा त्रास अधिक होतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर सतत परिणाम होऊन बाळाचा त्रास वाढतच जातो, बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव पाहतो, आणि हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न गावकऱ्यांकडून आणि बाळाच्या घरातल्यांकडून केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते याची थोडीशी कल्पना आलीच असेल.

या चित्रपटाची निर्मिती निर्माते-दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली. तर 'अमोल कागणे फिल्म्स' प्रस्तुत हा चित्रपट असणार आहे.

या चित्रपटाची कथा आणि संवाद शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे लिखित असून चित्रपटातील गाणी विजय गटलेवार यांची असून गाण्याचे बोल सुबोध पवार लिखित आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले असून या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी रामनी रंजन दास आणि वीरधवल पाटील यांनी उत्तमरीत्या पेलली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, सुधाकर बिराजदार, अरुण गीते, महेंद्र तिसगे, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी या कलाकारांचे अभिनय पाहायला मिळणार आहेत. अजाणावर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट येत्या 24 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...