आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस्विनी पंडितचा गौप्यस्फोट:पुण्याच्या नगरसेवकाने केली होती अश्लील मागणी, अभिनेत्रीने तोंडावर फेकले होते पाणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या अभिनयाच्या बळावर मराठी इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण या हरहुन्नरी अभिनेत्रीचा इथवरचा प्रवास म्हणावा तितका सोपा नाही. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला अपमानास्पद अनुभव आला होता. सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये तेजस्विनीने स्ट्रगलिंगच्या काळात तिला आलेल्या अनुभवांवर भाष्य केले. संघर्षाच्या दिवसांत नाव कमावण्यासाठी धडपडत असताना पुण्यातील एका नगरसेवकाने तिच्याकडे घाणेरडी मागणी केली होती, असा खुलासा तेजस्विनीने केला आहे. यावेळी तेजस्विनीने त्या नगरसेवकाचे नाव घेणे टाळले.

तेजस्विनीने काय सांगितले?
सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तेजस्विनी म्हणाली, "करिअरच्या सुरुवातीला 2009-2010 मध्ये मी पुण्यात सिंहगड रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होते. मी राहत असलेले घर एका नगरसेवकाच्या मालिकीचे होते. एकेदिवशी मी त्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये भाडे देण्यासाठी गेले तेव्हा त्याने माझ्याकडे घाणेरडी मागणी केली," असा खुलासा तेजस्विनीने केला.

तेजस्विनी पुढे म्हणाली, त्यावेळी त्याच्या टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास मी उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला. तसेच अशा मार्गाचा अवलंब केला असता तर भाड्याच्या घरात राहिले नसते, करिअरच्या सुरुवातीलाच माझे घर असते आणि दारात गाड्या असत्या, असे नगरसेवकाला सुनावल्याचे तेजस्विनीने सांगितले.

2004 मध्ये सिनेसृष्टीत ठेवले पाऊल
तेजस्विनी ही अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या आहे. 2004 मध्ये केदार शिंदेंच्या 'अगं बाई अरेच्चा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. पहिल्याच चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. 'मी सिंधुताई सपकाळ', 'ये रे ये रे पैसा', 'तू ही रे', 'देवा', 'एक तारा' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केले.

मोठा पडदा गाजवण्यासोबतच तेजस्विनीने छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 'एकाच या जन्मी जनू', 'लज्जा', '100 डेज' या मालिकांमध्येदेखील तिने काम केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तेजस्विनीने पाऊल ठेवले आहे.

'रानबाजार', 'समांतर' या वेब सिरीजमध्ये तिने काम केले आहे. इतकेच नाही तर आता निर्माती म्हणूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्लॅनेट मराठीवर आलेल्या 'अथांग' या वेब सिरीजची ती निर्माती आहे. याशिवाय तेजस्विनीच्या 'क्रिएटिव्ह वाइब' या प्रोडक्शन हाऊसचा 'बांबू' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजस्विनी एक उद्योजिकादेखील आहे. अभिज्ञा भावेसोबत मिळून ती साड्यांचा 'तेजाज्ञा' हा ब्रँड चालवते.

बातम्या आणखी आहेत...