आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंगभूमी दिन विशेष:आजपासून नाट्यगृहे उघडणार; बदलणाऱ्या अर्थकारणावर मान्यवरांचे भाष्य

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी रंगभूमीवर कधीही पाहिले नाहीत असे प्रयोग येणाऱ्या दिवसांत करावे लागतील

रंगदेवता आणि रसिकांना विनम्र अभिवादन करून अमुक अमुक प्राॅडक्शन सादर करत आहे तमुक तमुक नाटक.... ही स्वागतिका आता नाट्यगृहांमध्ये रसिकांना एेकायला मिळणार आहे. रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने ५० टक्के आसनक्षमतेच्या मुख्य नियमावर तसेच इतर काही नियमांवर नाटकांचे पडदे उघडण्याची तिसरी घंटा वाजवली. ही आनंदवार्ता असली तरी आता मध्यंतरानंतर रंगणाऱ्या रंगभूमीचा ‘अर्थ’ अर्थात अर्थकारण बदलणार आहे. कमी प्रेक्षक, कमी कामगार, भाडे, वाहतूक, मानधन या सगळ्यांचा विचार करून आता नाटक हाेणार आहे. याविषयी रंगभूमी दिनानिमित्त आणि सरकारच्या स्वागतार्ह निर्णयाबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत, त्यांच्याच शब्दांत...

हा हाेता पाॅझ : प्राजक्त देशमुख (नाट्य अभिनेता, दिग्दर्शक)

सगळं थांबून गेलं इथपर्यंत ठीक होतं; पण सगळं भांबावून गेलं हाेतं. जिवंत कला आता फक्त आठवणीत राहतील का ? पुन्हा रंगमंचावर याचि देही याचि डोळा अंगावर रोमांच उभा राहील का? प्रयोगानंतर प्रयोगाइतकंच कलाकाराला काय हवंसं असतं तर ते म्हणजे मागे येऊन भेटणारे प्रेक्षक. ते पुन्हा कधी घडेल का? असे असंख्य प्रश्न टोपलीत निपचित पडलेल्या नागासारखे भासू लागले हाेते. भयानक, थंड आणि अनपेक्षित.

सगळ्यांचं सगळं चाकोरी सांभाळून सुरू झालं हाेतं. पण नाट्यगृहाचा ब्लॅकआऊट काही सरत नव्हता. दरम्यान, गेले सहा-सात महिने डिजिटल माध्यमात काही नवे प्रयोग पाहायला मिळाले. न्यूयाॅर्क टाइम्समध्ये या डिजिटल नाटकाविषयी एक लेख आला होता त्याचं शीर्षक फार समर्पक होतं. ‘Digital Theater Isn’t Theater. It’s a Way to Mourn Its Absence.’ अनेक कल्पक आणि चांगले डिजिटल प्रयोग झाल्यानंतरही प्रश्न खरा हा हाेता की सगळं सुरळीत झाल्यावरचं नाटक कसं असेल? ‘सगळं सुरळीत होणं’ याची नेमकी व्याख्या काय? कारण (निष्काळजी अपवाद सोडल्यास) मास्क तर आता दैनंदिन जीवनाचा भाग झालाच आहे.

कोविडपश्चातच्या प्रेक्षकांच्या अभिरुचीत काही बदल झाला असेल का? हा एक पहिल्या दिवसापासून घोंगावणारा प्रश्न आहे. इ. स. १८९७ ते १९२० या कालखंडात श्री. कृ. कोल्हटकर, कृष्णाजी खाडिलकर, नरसिंह केळकर, गडकरी या नाटककारांनी हा काळ भारून टाकला. हे सांगताना १८९७ या वर्षाला महत्त्व आहे. कारण पुण्यात प्लेगची साथ होती आणि नानाविध तर्कांमुळे सगळं थांबल्याने नाट्यसृष्टी तेव्हाही काही संपली नव्हती. मराठी नाटकाची भरभराट व्हायचा काळ हाच होता असे अनेक दाखले आपण वाचले आणि जुन्या लोकांनी अनुभवले आहेत. आता पन्नास टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरू हाेणार आहेत. पण यात पुन्हा मराठी नाट्यनिर्मात्यांचे मरण आहेच. आधीच नाटक धरायलाच अमुक वेळ लागणार आहे. याखाली तो कितीतरी प्रयोग तोट्यात करत असतोच. कोविडपश्चातचे नाटक माझ्या मते अधिक टोकदार असेल. एकांतवास आणि शेकड्याने मरण भोगलेल्या जगाला नाटक अधिक टोकदारपणे भिडेल. जेव्हा जेव्हा समूहावर नैसर्गिक अथवा युद्धासारखा घाला झाला आहे, त्यानंतरच्या भावना अधिक टोकदार झाल्या आहेत हे इतिहासात आपण तपासू शकतो. या न्यायानेच आता होणारी नाटके नव्या संवेदना घेऊन येणारी असतील, अशी आशा करायला हरकत नाही किंवा प्रेक्षकांच्या जाणिवा आणखी जाग्या झाल्या असतील या आशावादाला जागा आहे. परंतु, यादरम्यान ज्या डिजिटल सादरीकरणांनी उचल घेतली आहे त्याचाही प्रवास सुरूच राहावा आणि नव्या शक्यतांनी बहरत राहावे. नाट्यगृहातला पडदा उद्या उघडेलच. भेट नक्की आहे. भेटीचं अंतर वाढल्याने ही भेट कडकडून हाेणार आहे.

भीती अनाठायी

पुन्हा नाट्यगृहे शंभर टक्के भरतात या गृहीतकावर पन्नास टक्के परवानगी दिली आहे. तरी आताशा मुळात नाटकं शनिवार, रविवारीच झाली आहेत. पण म्हणून ते संपेल की काय ही भीती अनाठायी आहे. एकशे सत्तरपेक्षा जास्त आयुष्य असलेल्या या बुजुर्ग वडाच्या पारंब्या आता खोड म्हणून ठायी ठायी मातीत रुतून आकाशात झेपावल्या आहेत.

पुन्हा मेकअप : जयप्रकाश जातेगावकर (अध्यक्ष, महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरक व्यवस्थापक संघ)

काेरोनानंतरच्या मराठी रंगभूमीचा विचार करता बदल सर्वच पातळ्यांवर दिसणार आहे. पावणेदोनशे वर्षांनंतरही मराठी रंगभूमी टवटवीत दिसते त्याचं मुख्य कारण तिच्या ठायी असलेली सजगता, ज्यामुळे ती समाजातील स्थित्यंतरं टिपण्यासाठी सदैव तत्पर असते. आता होऊ घातलेल्या बदलांचा विचार आपल्याला चार पातळ्यांवर करावा लागेल - नाटकांचे विषय, सादरीकरण, नाट्यगृह व्यवस्थापन आणि प्रेक्षकांची बदलती मानसिकता.

मराठी नाटकांचा हक्काचा प्रेक्षकवर्ग हा साधारण चाळिशीपुढचा. पण, या लाॅकडाऊन काळात हा वयोगटही वेब सिरीज नावाच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचला. या रसिकांना पुन्हा थिएटरकडे आणण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे फक्त विषयांत विविधता आणून भागणार नाही तर सादरीकरणाच्या लयीतही वेगळ्या विचाराला जागा असणार आहे. थिएटर सुरू झाल्यावर कमीत कमी सहा महिने हे सगळं रुळायला लागणार आहे. परंपरागत चालत आलेल्या नाट्य व्यवस्थापनात बदलांचा वेग मोठा राहील. प्रयोगांची ९० टक्के तिकीट विक्रीही ऑनलाइन माध्यमाद्वारे होईल. प्रेक्षकांची माहिती संकलित करणे आणि तिचे विश्लेषण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रेक्षकांच्या आवडीनिवडीबरोबरच त्यांना अधिक बोलतं करून त्यांचा क्रियाशील सहभाग वाढवणं गरजेचं ठरणार आहे. प्रयोगांचं डाॅक्युमेंटेशन करणं आणि तो ठेवा जतन करत ऑनलाइन वेगळा नवीन प्रेक्षकवर्ग तयार करण्याचे प्रयत्नही अधिक वेगाने होणार आहेत. आपल्या हक्काच्या रसिकवर्गाला तयार करून तो बांधून ठेवण्याची कसरत करावीच लागणार आहे. मग त्यासाठी रसिक योजना असो वा स्वस्त नाटक योजनेचे ग्रुप या गोष्टी अधिक व्यापक स्वरूपात करण्याची हीच योग्य वेळ आहे. आतापर्यंत आपल्याला आयता प्रेक्षकवर्ग मिळाल, पण इथून पुढे तो तयार करावा लागेल. Catch Them Young याप्रमाणे शाळेतच ‘नाटक’ हा विषय आणावा लागेल. एखाद-दुसरा अपवाद वगळता बालरंगभूमी आज मोडकळीस आलेली आहे. आता गरज आहे रंगमंचच शाळेत घेऊन जायची! सद्य:स्थितीत मुंबई-पुण्याबाहेर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच ठिकाणी नाटकांचे प्रयोग करण्याजोगी नाट्यगृहे उपलब्ध आहेत. कधीकाळी हीच संख्या ६० च्या घरात होती. शासनाने पुढाकार घेऊन बंद पडलेल्या नाट्यगृहांना उभे करणे गरजेचे आहे. नाट्यगृह नसलेल्या गावांचा सांस्कृतिक पोत हा ढासळलेला असतोे. त्या दृष्टीने ही केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. जी नाट्यगृहे चालू स्थितीत आहेत तिथेही स्वच्छता आणि मूलभूत सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. जे-जे घटक मराठी नाटकांशी पूर्णवेळ संबधित आहे ते आज बऱ्यापैकी संघटित आहेत, आता गरज आहे ती भविष्यात उपयोगी पडेल असा निधी उभारण्याची व नाटकांच्या प्रसिद्धीची... काेरोनानंतरची रंगभूमी ही अधिक प्रयोगशील, प्रगतिशील आणि आवाका वाढवणारी असेल हे निश्चित.

नवीन प्रयाेग दिसतील

नवीन SOP मुळे आणि आर्थिक विवंचनेमुळे अनेक गोष्टींवर तूर्तास स्वल्पविराम राहणार आहे. परंतु Netflix आणि Amazon सारख्या नवीन शेजाऱ्यांबरोबर राहायचे असल्यास मराठी रंगभूमीवर कधीही पाहिले नाहीत असे प्रयोग येणाऱ्या दिवसांत करावे लागतील आणि ते लवकरच दिसूनही येतील.