आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलाम:'तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची...' कोरोना लढवय्यांना मराठी कलाकारांचा गाण्यातून मानाचा मुजरा 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसदल, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सुरक्षा रक्षक, शेतकरी, भाजी विक्रेते, अत्यावश्यक सेवा पुरवणारे या सर्वांना मराठी कलाकारांचा सलाम...

कोरोनाव्हायरसचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. अशावेळी कोरोनाशी दोन हात करत आहेत अत्यावश्यक सेवेत येणारे कर्मचारी. पोलिसदल, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सुरक्षा रक्षक, शेतकरी, भाजी विक्रेते, अत्यावश्यक सेवा पुरवणारे या सर्वांना प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून सलाम करतोय.

आता एक दोन नव्हे तर तब्बल 32 मराठी कलाकारांनी एकत्र येऊन 'तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची..' या गाण्याच्या माध्यमातून या सर्वांच्या कार्याला मानाचा मुजरा केला आहे. समीर विद्वांस आणि हेमंत ढोमे यांची ही संकल्पना आहे.

या व्हिडिओत अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, चिन्मय मांडलेकर, आदिनाथ कोठारे, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, ललित प्रभाकर, अभिनय बेर्डे, गश्मीर महाजनी, प्रियदर्शन जाधव, जसराज जोशी, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, क्षिती जोग, रिंकू राजगुरु, मृण्मयी देशपांडे, वैदेही परशुरामी, श्रेया बुगडे, अनिता दाते, मिथिला पालकर, शिवानी सुर्वे, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, सायली संजीव, हृता दुर्गुळे अशी कलाकारांची मांदियाळी आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरातूनच हा व्हिडिओ केला आहे.

'तू चाल पुढं तुला  रं गड्या भीती कशाची..' हे मूळ गाणं 1937 साली आलेल्या 'कुंकू' या चित्रपटातील आहे. शांताराम आठवले यांचे हे गीत पुढे समीर विद्वांस दिग्दर्शित 'डबल सीट' या चित्रपटात वापरण्यात आले होते. आता हे गाणं पुन्हा एकदा रिक्रिएट करून अत्यावशक सेवेत कार्यरत असणाऱ्यांना समर्पित केले आहे. हृषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी या गाण्याला वेगळा टच दिला आहे. तर अजय गोगावले, प्रियंका बर्वे आणि दीपिका दातारने यांनी ते गायले आहे.  

बातम्या आणखी आहेत...