आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिसला लागले 'वेड':पहिल्या आठवड्यात 10 कोटींची कमाई, विकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये समावेश

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखचा 'वेड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलीयाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तीन दिवसांतच बॉक्स ऑफिसला वेड लावले आहे. विकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीमध्ये त्याचा सहभाग झाला आहे.

'वेड' हा चित्रपट शुक्रवारी 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 2.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर विकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. चित्रपटाने शनिवारी 3.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर रविवारी चित्रपटाने 4.50 कोटींचा गल्ला जमावला. प्रदर्शनाच्या तीन दिवसांत चित्रपटाने 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

विकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये पाचव्या स्थानावर 'वेड'

'वेड' या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. आजवर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांमध्ये विकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे. हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर 'सैराट' आहे. या चित्रपटाने 12.10 कोटी कमावले होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 'टाइमपास 2' आहे. या चित्रपटाने 11 कोटींचा गल्ला जमावला होता. रितेशचा 'लय भारी' चित्रपट आहे. या चित्रपटाने 10.55 कोटी कमावले होते. तर 'नटसम्राट'ची कमाई 10.25 कोटी रुपये होती. त्यानंतर आता 10 कोटी कमावत 'वेड' चित्रपट या यादीमध्ये सहभागी झाला आहे.

'वेड' या चित्रपटात जिनिलीया आणि रितेशसोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, जिया शंकर, शुभंकर तवडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतोय.

बातम्या आणखी आहेत...