आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यवान सावित्रीच्या निमित्ताने...:वेदांगी सांगते - सावित्रीमुळे मी माझ्या निर्णयांवर ठाम राहायला शिकले

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेदांगीसोबत साधलेला खास संवाद -

एका दृढनिश्चयी, जिद्दी आणि शूर कन्येची एक अनोखी कहाणी 'सत्यवान सावित्री'. ही मालिका 12 जून पासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत सावित्रीची भूमिका ही अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी निभावतेय. या मालिकेबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल तिच्यासोबत साधलेला हा खास संवाद

  • तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांगा?

सावित्रीचा अर्थ सूर्य असा आहे. त्यामुळे सूर्यच तेजही तिच्यात आहे आणि त्याचबरोबर तिचा जन्म कमळातून झाला आहे. कमळाच्या फुलातील मोहकपणा हा देखील सावित्रीमध्ये आहे. तिचा ऑरा खूपच पॉझिटिव्ह आहे. सावित्री ही सगळ्यांचा विचार करणारी आहे. ती तिचा विचार शेवटी करेल पण बाकी लोकांचा विचार ती आधी करेल. अशी ही सावित्री तिच्या निर्णयांवर देखील खूप ठाम असते.

  • या भूमिकेसाठी तू कशी तयारी केली?

सावित्री या भूमिकेच्या अभ्यासासाठी मी शक्य तेवढा वाचन केलं. सावित्री हि तिच्या निर्णयांवर ठाम असते आणि हे साकारताना कधी कधी ते उद्धट वाटू शकतं किंवा तिचे निर्णय ती कोणावर तरी लादते आहे असं देखील वाटू शकतं, ते वाटू नये याची मला कलाकार म्हणून खूप काळजी घ्यावी लागते आहे. तिच्यामधील सौम्यपणा आणि मृदुपणा पण त्याच वेळी तिच्यामध्ये असलेला ठामपणा आणि स्थैर्य कसं सादर करता येईल याची मी खबरदारी घेतेय तसंच तिची देहबोली आणि तिची बोलण्याची पद्धत हि खूप मृदू आहे त्यासाठी देखील मी सराव केला.

  • पौराणिक मालिकेत काम करताना कलाकार म्हणून काय जास्त आव्हानात्मक असतं?

पौराणिक मालिका करताना सगळ्यात जास्त खबरदारी घ्यावी लागते ती म्हणजे भाषेची. या मालिकेत बोलीभाषा हि वेगळी असते. त्यामुळे हे खूप आव्हानात्मक होतं. तसंच आम्ही शूटिंग हे क्रोमावर करतो त्यामुळे ते देखील खूप आव्हानात्मक आहे कारण लाईव्ह लोकेशनवर आपण आजूबाजूच्या गोष्टी पाहून त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो पण इथे सगळं इमॅजिन करून अभिनय करावा लागतो.

  • या मालिकेमधील तुझ्या भूमिकेमुळे तुझ्यामध्ये काही बदल झाला का?

सावित्रीमुळे मी माझ्या निर्णयांवर ठाम राहायला शिकले.

  • प्रेक्षकांना काय आवाहन करशील?

- प्रेक्षकांना फक्त वटपौर्णिमा का साजरी करतात याची कथा माहिती आहे. पण सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवण्यासाठी काय काय केलं. त्याची पार्श्वभूमी काय आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. आजच्या काळात जिथे घटस्फोट फोफावतोय तिथे खरं नातं काय असतं आणि ते कसं टिकवावं हे या कथेतून प्रेक्षकांना कळेल. सावित्री ही राजकन्या होती, तिच्या सेवेसाठी दासी तैनात असायच्या. राजमहालात राहणारी सावित्री हि सत्यवानाच्या प्रेमासाठी आनंदाने तिचा सर्व ऐषोआराम सोडून जंगलात राहायला आली आणि इतकंच नव्हे तर तिने फक्त प्रेम केलं नाही तर ते निभावलं देखील. खरं प्रेम कसं निभावतात याचा प्रत्यय या कथेतून प्रेक्षकांना येईल त्यामुळे प्रेक्षकांनी आवर्जून ही मालिका पाहावी अशी मी विनंती करेन.

बातम्या आणखी आहेत...