आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'झपाटलेला' या गाजलेल्या चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी वयाच्या 83 व्या वर्षी या जगाचा कायमचा घेतला आहे. पुण्यात त्यांचे निधन झआले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
प्रसिद्धी मिळाली पण...
जवळजवळ दोन दशकांपूर्वी रिलीज झालेल्या ‘झपाटलेला’ या सिनेमाचा उल्लेख निघाला की सर्वपथम आठवतो तो तात्या विंचू आणि त्याला ‘ओम फट् स्वाहा’ हा मृत्युंजय मंत्र देणारा बाबा चमत्कार. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासह राघवेंद्र कडकोळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात होत्या. राघवेंद्र कडकोळ यांनी बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा वठवली होती. 'झपाटलेला' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही राघवेंद्र झळकले होते. प्रसिद्धी मिळाली मात्र पैसे कमावता आला नाही याची खंत त्यांना शेवटपर्यंत होती. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांना अखेरचे दिवस व्यतीत करावे लागले.
वृद्धाश्रमात होते वास्तव्याला
झपाटलेला चित्रपटावेळी राघवेंद्र यांचे वय 50 होते तर झपाटलेला 2 वेळी ते 70 वर्षांंचे होते. दोन्ही चित्रपटांतील त्यांनी वठवलेली “बाबा चमत्कार” ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. पण या अभिनेत्यावर म्हातारपणी हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतित करण्याची वेळ आली होती. राघवेंद्र त्यांच्या पत्नी लतिका कडकोळ यांच्यासोबत पुण्यातील बावधन येथील पालाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर येथे वास्तव्याला असल्याचे वृत्त मागील वर्षी आले होते.
नौदलात जायची होती इच्छा
राघवेंद्र कडकोळ यांनी कृष्णधवल चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. रंगभूमीवर त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत काम केले. नववीत शिकत असताना असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण झापटल्यासारखे वाचले. त्यामुळे सावरकरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर होऊ लागला. याच दरम्यान त्यांनी आपले शिक्षण सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. नौदलात भरती होण्यासाठी परीक्षा पास केल्या. भारतीय आयएनएस विभागात एका टीम सोबत त्यांना पाठवण्यात आले. तेथील समुद्र, बोटी पाहून ते अगदी भारावून गेले. शेवटी आपण जे ठरवले ते प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद त्यांना होत होता. परंतू त्या टीममधून राघवेंद्र यांना बाजूला काढून पुन्हा मेडिकल टेस्ट घेण्यासाठी पाठवण्यात आले. यागोदरच सगळ्या मेडीकल टेस्ट पास करूनच त्यांना तिथे पाठवण्यात आले असताना पुन्हा ही टेस्ट कशासाठी? असा प्रश्न त्यांच्या मनात घोळत बसला. रिपोर्टमध्ये त्यांच्या एका कानात दोष असल्याचे कारण सांगून त्यांना घरी पाठवण्यात आले होते.
टायपिस्ट म्हणून करु लागले होते नोकरी
घरी परतल्यावर राघवेंद्र यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरातील आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी जंगल खात्यात टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरी मिळवली होती.
म्हणून सोडावी लागली होती नोकरी...
नोकरी करत असताना राघवेंद्र यांनी रंगभूमीवर पडद्यामागे कलाकारांना निरोप देणे, चहा देणे, खुर्च्या मांडणे अशी मिळेल ती कामे स्वीकारली. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच कोणासमोर काम मिळवण्याची मागणी केली नाही. “करायला गेलो एक” हे पहिले व्यावसायिक नाटक त्यांनी साकारले. महिन्यातून 20-22 दिवस नाटकांचे दौरे असल्याने नोकरीवर परिणाम होऊ लागला. त्यामुळे हातच्या नोकरीवर त्यांना पाणी सोडावे लागले होते.
पुरस्कारांनी झाला गौरव
“अश्रूंची झाली फुले” नाटकातील “धर्माप्पा” ही भूमिका राघवेंद्र यांच्याकडे ओघाने आली होती. एक कानडी व्यक्ती मराठी कसे बोलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे धर्माप्पा. त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक देखील झाले. धोंडी, देवदासी, हसुया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या चित्रपट नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्यातील कलागुणांमुळे बालगंधर्व जीवन पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी राघवेंद्र यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे 'नटवर्य केशवराव दाते पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते. त्यांनी 'गोल्ड मेडल' नावाचे पुस्तक लिहिले होते.
(दिवंगत अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचा अल्प परिचय संजीव वेलणकर यांच्या फेसबुक पेजवरुन साभार.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.