आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाने हिरावली गुणी अभिनेत्री:'माझ्या अतिशय आवडत्या सहकलाकाराला परमेश्वराने बोलवून घेतले... अवेळी..', अभिनेते प्रशांत दामले हळहळले

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माधवी गोगटे यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

रंगभूमी, चित्रपट व छोटा पडदा आपल्या अभिनयाने गाजवलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री माधवी गोगटे यांचे रविवारी दुपारी एकच्या सुमारास मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. त्या 58 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती व विवाहित कन्या आहे. गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा ही त्यांची गाजलेली नाटके होत. माधवी गोगटे यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले, 'सौ माधवी गोगटे... माझी आवडती सहकलाकार... गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, बे दुणे पाच, लेकुरे उदंड जाली... जवळ जवळ 2500 प्रयोगात आम्ही एकत्र काम केल. अतिशय मनमिळावू, उत्तम खणखणीत आवाज, विनोदाचे उत्तम टाईमिंग आणि उत्तम स्वभाव.. नंतर ती हिंदी सीरिअल मधे खुप बिझी झाली पण मराठी नाटकाची नाळ तुटू दिली नाही. अशा माझ्या अतिशय आवडत्या सहकलाकाराला परमेश्वराने बोलवून घेतल. अवेळी..'

अभिनेते सुनील तावडे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

माधवी गोगटे यांचा जन्म 7 ऑगस्ट 1964 रोजी झाला. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. 1987 मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर 1990 मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या नाटकांसोबतच अंदाज आपला आपला अशा मराठी नाटकात त्या झळकल्या. तर ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

अलीकडेच त्यांनी 'अनुपमा' या लोकप्रिय हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांनी रुपाली गांगुलीच्या आईची भूमिका साकारली होती.

बातम्या आणखी आहेत...