आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. गेल्यावर्षी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर 3 मे 2022 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानी हे लग्नाआधी बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते.
शिवानीने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विराजससोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. "या वेड्या जोडप्याला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा," असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
शिवानी आणि विराजसच्या या फोटोवर सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
अशी आहे दोघांची लव्हस्टोरी
विराजस कुलकर्णी दिग्दर्शित 'डावीकडून चौथी बिल्डिंग' या नाटकात शिवानीने अभिनय केला होता. तिथेच दोघांची ओळख झाली होती. लग्नापूर्वी दोघे 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. गेल्या जानेवारी महिन्यात दोघांनी एक फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची ऑफिशिअल घोषणा केली होती. या फोटोत शिवानी तिच्या हातातील अंगठी दाखवताना दिसली होती. फोटो शेअर करताना शिवानीने लिहिले होते, 'अंगठी घातली...' यासह तिने #virani (विरानी) हा हॅशटॅग वापरला होता.
अभिनेत्यासोबतच लेखक आणि दिग्दर्शक आहे विराजस
विराजस हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. 'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. विराजसने 'होस्टेल डेज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. विराजस अभिनेत्यासोबत एक लेखक आणि दिग्दर्शकही आहे. 'थेटर ऑन एंटरटेन्मेंट' ही विराजसची निर्मिती संस्था असून त्याने अनेक नाटकांची निर्मिती केली आहे. 'अनाथेमा' या नाटकात त्याने अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली होती. शिवाय मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
दुसरीकडे शिवानीदेखील मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने 'बन मस्का' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. 'सांग तू आहेस ना', ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या आहेत. नुकतीच ती 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शिवानीची लग्नानंतरची ही पहिलीच मालिका आहे. तर विराजसदेखील 'सुभेदार' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.