आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिकलीवरुन पुन्हा वादंग:'टिकली लावायची की नाही हे बाईला ठरवू द्या', व्हिडिओ शेअर होताच झी मराठीवर संतापले  प्रेक्षक

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यंतरी टिकलीवरुन चांगलेच वादंग उठले होते. शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना आधी टिकली लाव नंतर मी तुझ्याशी बोलतो, अशी भूमिका घेतली होती. हा मुद्दा महाराष्ट्रभर गाजला. महिलांनी टिकली लावावी की लावू नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, अशा प्रतिक्रिया समोर येत होता. आता झी मराठी वाहिनीने याविषयी शेअर केलेला एक व्हिडिओ गाजतो आहे. त्या व्हिडिओवरुन प्रेक्षक मात्र भडकले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
झी मराठी वाहिनीवर फू बाई फू हा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातील एका स्किटचा व्हिडिओ झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत टिकलीबाबत भाष्य करण्यात आले आहे.

स्किट सादर करणारी अभिनेत्री तिच्या नवऱ्याला सांगते की, 'मी म्हणजे बाई ना, मग टिकली लावायची की नाही लावायची हे बाईला ठरवू दे ना. तुम्ही हे वेड्यागत काय म्हटलं की टिकली म्हणजे नवरा जिवंत असण्याचं प्रतीक, मग मी आरशाला टिकली लावून अंघोळीला जाते तेव्हा आरशाला येऊन चिकटता की काय?'

ती पुढे म्हणते, 'इतकंच काय मेकअप करताना मी कितीवेळ बिना टिकलीची असते. तेवढ्या वेळात कोमात जाता की काय? अहो असं काय करता आपलं हे नातं प्रेमावर टिकलं आहे टिकलीवर नाही.' या स्किटमधील डायलॉग उपस्थित मंडळी एन्जॉय करताना दिसत आहे. या कार्यक्रमात अभिनेता उमेश कामत, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत या परिक्षक आहेत. तर अभिनेत्री वैदेही परशुरामी सूत्रसंचालक आहे. या सर्वांनीच या प्रहसनाला चांगली दाद दिली. पण प्रेक्षक मात्र भडकले आहेत.

प्रेक्षकांनी केले ट्रोल
झी मराठी वाहिनीने हा व्हिडिओ शेअर करताच प्रेक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी कमेंट करत या कार्यक्रम आणि चॅनेलला ट्रोल केले आहे. कुंकू किंवा टिकली आपली संस्कृती असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नावाखाली काही वर्षांनी फक्त कपाळ करंटे लोकच या पृथ्वीवर जिवंत असतील... टिकली लावणारी एक सुसंस्कृत पिढी नामशेष झालेली असेल', असे एका यूजरने म्हटले आहे. तर आणखी एका यूजरने म्हटले, 'हिंदु असल्याचा अभिमान बाळगा, जर तुम्हाला अभिमान बाळगता येत नसेल तर इतर मुलींना तरी बिघडवू नका.' 'टुकार विनोद करून आपल्याच धर्माची खिल्ली उडवणे म्हणजे भविष्य धोक्यात आहे', अशा विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

बातम्या आणखी आहेत...