आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स 2020:सई ताम्हणकर ठरली मोस्ट नॅचरल परफॉर्मर ऑफ दि इयर, सईसह या कलाकारांनी उमटवली आहे पुरस्कारांवर मोहोर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झी टॉकीजवर लवकरच झळकणार झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस् 2020 चा दिमाखदार सोहळा...

प्रत्येक अभिनेत्याला आपला परफॉर्मन्स आपल्या रसिकांना नैसर्गिक वाटावा, असं वाटत असतं. त्यासाठी अनेक कलाकार कसून मेहनतही घेताना आपण पाहतो. अभिनेत्री सई ताम्हणकरला तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी नेहमीच तिच्या चाहत्यांची वाहवाही मिळाली आहे. आणि आता ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’नेही सईच्या ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटामधल्या भूमिकेसाठी ‘मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ दि इयर’ हा पुरस्कार देऊन तिच्या नैसर्गिक अभिनयाला पोचपावती दिलीय.

झी टॉकीजचे मनापासून आभार मानताना सई म्हणते, “माझ्या कारकिर्दीत झी नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहिलंय. मला असं वाटतं, तुम्ही कितीही वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत असलात, तरीही परफॉर्मन्ससाठी जेव्हा पुरस्काराची दाद मिळते, तेव्हा ती लाखमोलाची असते. अशी शाबासकी तुम्हाला अजून चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देते. विशेष धन्यवाद माझ्या दिग्दर्शकाला द्यावेसे वाटतायत. दिग्दर्शक उपेंद्र सिधयेने मला पायल मेहताच्या भूमिकेत पाहिलं. माझी आणि अमेयची जोडी रूपेरी पडद्यावर चांगली दिसेल, हे त्याचे व्हिजन होते. उपेंद्रच्या रूपात मला एक चांगला मित्र मिळाला.”

सध्याच्या न्यू नॉर्मलमध्ये नेहमीसारखा मोठा पुरस्कार सोहळा झाला नाही. हे कुठेतरी सई ताम्हणकरही मिस करतेय. ती म्हणते, “स्टेजवर जाऊन पुरस्कार घेणं, ही आम्हा अभिनेत्यांसाठी अभिमानाची बाब असते. पण यंदाच्या परिस्थितीमध्ये अर्थातच हे शक्य नव्हतं. त्यामूळे यंदा अवॉर्ड फंक्शन खूप मिस करतेय.”

आता खरं तर सिनेमा रिलीज होऊन एक वर्ष झालंय. पण सिनेमा अमेझॉन प्राइमवर रिलीज झाल्यावर अनेकांनी तो परत पाहिला. आणि सईला सोशल मीडियावरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. सई म्हणते, ”ओटीटीवर सिनेमा रिलीज झाल्यावर काहींनी तो पहिल्यांदाच पाहिला. काहींनी परत पाहिला. माझा आणि अमेयचा स्लो-मोशनमधला डान्स अनेकांना आवडला. ‘अशी अतरंगी भूमिका तूच करू शकतेस’, ‘तूच अशी क्रेझी आहेस’, अशा विविध कॉम्प्लिमेन्ट्स आणि प्रतिक्रिया सतत येत असतात. त्या खूप एन्जॉय करते. आणि आता अवॉर्ड मिळालंय तर त्यानिमित्ताने चाहत्यांना सांगावंस वाटतंय, की आज होऊन जाऊ दे, आइस्क्रिम भातचा बेत.”

  • सईसह या कलाकारांनी उमटवली आहे पुरस्कारांवर मोहोर

यावर्षी सिनेमा विभागांसाठी जाहीर झालेल्या नामांकनाच्या यादीमध्ये येरे येरे पैसा २, चोरीचा मामला, टकाटक, स्वीटी सातारकर, गर्लफ्रेंड आणि गर्ल्स या सिनेमांचा समावेश करण्यात आला. ज्यात अधिकाधिक पुरस्कार पटकावत 'चोरीचा मामला' या सिनेमाने बाजी मारली. धमाल पंचेस आणि त्याहूनही धमाल अभिनय याने प्रेक्षकांना हसून हसून बेजार केलेल्या 'चोरीचा मामला' या सिनेमाने यावर्षीचा सर्वोत्कृष्ट विनोदी सिनेमाचा पुरस्कार पटकावला.

आपल्या लेखणीतून धमाकेदार विनोद आणि संवेदनशील विचार यांची सांगड घालत प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा तयार करण्यात लेखक उपेंद्र सिधये यांना यश आलं, म्हणूनच 'गर्लफ्रेंड' या सिनेमासाठी उपेंद्रला सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार दिला गेला. उत्तम अभिनेता आणि तेवढाच उत्तम दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या प्रियदर्शन जाधव याला चोरीचा मामला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा यावर्षीचा झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड देण्यात आला.

एकाहून एक सरस भुमिका साकारत प्रेक्षकांच्या ह्रदयावर स्वतःची अभिनयाची वेगळी छाप सोडलेला अभिनेता जितेंद्र जोशी याला पुन्हा एकदा 'चोरीचा मामला' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी यावर्षी दोन अभिनेत्रींची वर्णी लागली. चोरीचा मामला या सिनेमासाठी अमृता खानविलकर आणि स्वीटी सरकार या सिनेमासाठी अमृता देशमुख या दोघींना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस देण्यात आला.

'टकाटक' या सिनेमामधल्या टकाटक अभिनयासाठी अभिनेता प्रथमेश परब याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा तर 'चोरीचा मामला' या सिनेमातल्या मनोरंजक अभिनयासाठी किर्ती पेंढारकर हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय मराठी सिनेमातला ग्लॅमरस चेहरा म्हणजेच अभिनेत्री सई ताम्हणकर हिला 'गर्लफ्रेंड' या सिनेमामधल्या तिच्या बहारदार अभिनयासाठी गोदरेज एक्सपर्ट रिच क्रिम हेअर कलर मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स या विशेष पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.

बातम्या आणखी आहेत...