आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खानच्या गाजलेल्या 'दिल से' या चित्रपटातील 'छैय्या छैय्या' या गाण्याने मलायका अरोराला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. तिचा हा आयकॉनिक डान्स आजही चर्चेत असतो. या गाण्याची कोरिओग्राफर फराह खानने म्हटल्यानुसार, मलायका खूप भाग्यवान आहे की तिला हे गाणे मिळाले. फराहच्या म्हणण्यानुसार, जवळपास पाच अभिनेत्रींनी ट्रेनवर चढून डान्स करण्यास नकार दिला होता. शिल्पा शेट्टीपासून शिल्पा शिरोडकरपर्यंत या सर्व अभिनेत्रींनी 'छैय्या छैय्या'वर नाचण्यास नकार दिला. यानंतर अखेर मलायकाची या गाण्यासाठी निवड करण्यात आली होती.
मलायकापूर्वी 5 अभिनेत्रींना देण्यात आली होती 'छैय्या छैय्या'ची ऑफर
शाहरुख खान, मनीषा कोईराला आणि प्रिती झिंटा स्टारर 'दिल से' हा चित्रपट 21 ऑगस्ट 1998 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'छैय्या-छैय्या' या गाण्याची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित गाण्यांमध्ये केली जाते. या गाण्यामुळे मलायका एका रात्रीतून स्टार झाली होती.
अलीकडेच मलायकाने फराह खानला तिच्या 'मुव्हिंग इन विथ मलायका' या चॅट शोमध्ये आमंत्रित केले. या गाण्याशी संबंधित आठवणी सांगताना फराह खान गमतीने मलायका म्हणाली की, 'तुला छैय्या-छैय्या गर्ल म्हणून ओळखले जाते. पण तू स्वत:ला भाग्यवान समज कारण तुझ्यापूर्वी पाच अभिनेत्रींनी ट्रेनवर चढून डान्स करण्यास नकार दिला. तेव्हा कुठे तुला या गाण्यात नृत्य करण्याची संधी मिळाली.'
मेकअप आर्टिस्टने सुचवले होते मलायकाचे नाव
या गाण्यात मलायकाची एन्ट्री कशी झाली हेही फराहने सांगितले. ती म्हणाली, 'मलायकाचे नाव आमच्या लिस्टमध्ये नव्हते. आम्ही शिल्पा शेट्टी, शिल्पा शिरोडकर आणि इतर 2-3 अभिनेत्रींशी संपर्क साधला होता. त्यापैकी एकीला ट्रेनवर चढण्याची भीती वाटली तर एकीकडे तारखा उपलब्ध नव्हत्या. तेव्हा एका मेकअप आर्टिस्टने सांगितले की, तुम्ही मलायकाला ट्राय करू शकता, ती खूप चांगली डान्सर आहे. मलायका जेव्हा ट्रेनवर चढली तेव्हा ती खरोखरच ट्रेनवरुन उतरू शकते की नाही हे आम्हाला पाहायचे होते. पण तिने ते करुन दाखवले,' असे फराहने सांगितले.
मी भाग्यवान होते की, मला हे गाणे मिळाले
फराहसोबत बोलताना मलायका म्हणाली, 'बाकी अभिनेत्रींनी गाण्यात काम करण्यास नकार दिला हे माझ्यासाठी फायद्याचे ठरले. हे माझे नशीब होते आणि मला वाटते की हीच नियती होती. मला एकाच वेळी शाहरुख खान, मणिरत्नम, एआर रहमान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. हे सर्वजण आपापल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आहेत.'
25 वर्षांनंतरही 'छैय्या छैय्या' सर्वोत्तम गाण्यांपैकी एक आहे
मलायका पुढे म्हणाली, 'आज 25 वर्षांनंतरही जेव्हा आपण सिल्व्हर स्क्रीनवर मोठा प्रभाव टाकणाऱ्या गाण्यांचा विचार करतो तेव्हा छैय्या छैय्या हे त्यापैकी एक आहे. आजही लोक ते गाणे गुणगुणतात आणि त्यावर नाचतात. माझे आजही त्या गाण्यावर प्रेम आहे. मला अशा ब्लॉकबस्टर गाण्याचा भाग बनण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे.'
लठ्ठपणामुळे शिल्पाच्या हातून गेले होते छैय्या-छैय्या गाणे?
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला लठ्ठपणामुळे 'छैय्या छैय्या' हे गाणे सोडावे लागले होते. शिल्पा म्हणाली की, तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात लठ्ठ म्हटले जायचे. त्यामुळे आजच्या काळात जर तिने चित्रपटांमध्ये सुरुवात केली असती तर कदाचित तिला संधीच मिळाली नसती. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.