आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • James Bond Pass Away : The More Civilized, The More Cunning; Immortalizing The Pistol In A Certain Style, Now This Is The Rule Of Style Audition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माय नेम इज बाँड... जेम्स बाँड:जितका सभ्य तितका धूर्त हेर; विशिष्ट शैलीत पिस्तुलाची अदा अमर केली, आता हीच स्टाइल ऑडिशनचा नियम

अमित कर्ण | मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1962 मध्ये ‘डॉक्टर नो’ चित्रपटात पहिला जेम्स बॉँड साकारणारे हॉलीवूड अभिनेते शॉन कॉनरी यांचे निधन
  • 58 वर्षांत 12 अभिनेत्यांनी साकारला बाँड, कॉनरी हेच सर्वात लोकप्रिय

माय नेम इज बाँड, जेम्स बाँड! जगभरात हे नाव अजरामर करणारे पहिले जेम्स बाँड शॉन कॉनरी (९०) यांचे शनिवारी निधन झाले. कॉनरी यांचे जेम्स बाँडच्या रूपात सभ्य, पण तितकेच धूर्त गुप्तहेराचे पात्र आणि एका विशिष्ट शैलीत िपस्तूल ठेवण्याची अदा प्रचंड लोकप्रिय होती. १९६२ मधील ‘डॉक्टर नो’ चित्रपटपासून बाँड साकारणाऱ्या कॉनरींनी ७ बाँडपट केले. १९७१ मध्ये ‘डायमंड्स आर फाॅरेव्हर’ चित्रपटात ते शेवटचे बाँड बनले. ५० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या. १९८७ मधील ‘द अनटचेबल्स’साठी त्यांना सर्वाेत्तम सहायक अभिनेत्याचे ऑस्कर मिळाले. त्यांनी दोन वेळेस बाफ्टा व तीनदा गोल्डन ग्लोब अॅवॉर्डही जिंकले. १९९९ मध्ये पीपल मासिकाने त्यांना ‘स्मार्टेस्ट मॅन ऑफ द सेंच्युरी’ निवडले. तसेच १९८९ मध्ये त्यांना ‘सेक्सिएस्ट मॅन अलाइव्ह’चा किताबही देण्यात आला होता.

प्रख्यात चित्रपट समीक्षक रजा सेन म्हणाले, कॉनरी यांच्यामुळेच बाँडचे पात्र ‘अमर’ बनले. सुरुवातीस या पात्राचे जन्मदाते इयान फ्लेमिंग हे स्कॉटिश अभिनेता ही भूमिका कशी निभावेल, असे म्हणत विरोधात होते. बाँडपट सुपरहिट होऊ लागल्यानंतर त्यांनी आपल्या पुस्तकात ‘जेम्स बाँड असावा तर तो शॉन कॉनरीसारखा,’ असे लिहिले. कॉनरींच्या हेअरस्टाइलचीही क्रेझ होती. प्रत्यक्षात त्यांना टक्कल आहे, यावर लोकांचा विश्वासही बसत नसे. त्यांनी बाँडच्या सर्व भूमिका विग घालून केल्या. लोकांना त्यांच्या बाँड स्टाइलचे वेडच लागले होते. त्यांनी हे पात्र अशा उंचीवर नेले की तिथपर्यंत अद्यापही कुणी पोहाेचू शकलेले नाही. त्यांच्यानंतर प्रत्येक बाँड अभिनेत्याला ऑडिशन्समध्ये एक सीन करावाच लागतो. ‘उघड्या अंगावर टॉवेल गुंडाळून रूममध्ये आल्यानंतर बेडवर एका तरुणीच्या हातात गन आहे... अशा वेळी कसे रिअॅक्ट व्हाल,’ हा तो सीन. नंतरच्या बाँड अभिनेत्यांसाठी तो ऑडिशनचा नियम बनला होता. हा सीन त्यांच्या ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’ चित्रपटातला होता. एक पात्र म्हणून तुम्ही किती सहजपणे जेम्स बाँडला अलर्ट हेर म्हणून दाखवू शकता, हे त्यातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जायचा. त्यात क्लास व धूर्तपणाही आहे. आजही दुसरा सर्वाेत्तम बाँड कोण, यावर चर्चा झडतात. का तर, पहिला सर्वाेत्तम बाँड तर कॉनरी यांचाच होता!

५८ वर्षांत १२ अभिनेत्यांनी साकारला बाँड, कॉनरी हेच सर्वात लोकप्रिय

जेम्स बाँड मालिकेतील पहिला चित्रपट १९६२ मध्ये ‘डॉक्टर नो’ होता. आतापर्यंत २५ बाँडपट आले आहेत. २०२१ मध्ये २६ वा प्रदर्शित होईल. हॉलीवूडमध्ये २०१९ मध्ये या मालिकेवरील सर्व्हेत ४४% प्रेक्षकांनी शॉन कॉनरी हे सर्वात आवडते बाँड असल्याचे सांगितले होते. आजवर १२ कलाकारांनी बाँड साकारला आहे. ५८ वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेतील १२ वे बाँड डॅनियल क्रेगनंतर टॉम हार्डी पुढील बाँड कलाकार होऊ शकतात.