आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अपडेट:धक्कादायक कलाटणीनंतर ‘तुझसे है राबता’मध्ये पाच वर्षांचा लीप; नव्या रुपात दिसणार कल्याणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता पाच वर्षांनी सर्व काही बदललेले आहे. कल्याणीही पूर्णपणे नव्या अवतारात दिसेल.

रीम शेख (कल्याणी) आणि सेहबान अझीम (मल्हार राणे) यासारख्या कलाकारांचा नैसर्गिक सहज अभिनय आणि रंजक कथानकामुळे ‘झी टीव्ही’वरील ‘तुझसे है राबता’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. लॉकडाऊनपूर्वी या मालिकेचे कथानक एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आले होते. आता नव्याने सुरू झाल्यावर या कथानकाला नवे वळण देण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. किंबहुना आगामी भागातील एका घटनेनंतर कल्याणी आणि मल्हार यांच्या जीवनात मोठी उलथापालथ घडणार असून कल्याणी-मल्हार यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे, हे बघणे रंजक ठरणार आहे. कारण या मालिकेच्या कथानकाचा कालखंड पाच वर्षांनी पुढे नेण्यात आला आहे.

मोक्षचा जीव वाचविण्यासाठी कल्याणी आणि मल्हार यांनी किती शर्थीचे प्रयत्न केले होते, ते प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण मल्हारने आपल्या कारकीर्दीचा सत्यानाश केल्यामुळे सूडाने पेटलेल्या त्रिलोकने त्याच्याविरोधात कट रचला आहे. त्यानुसार तो मल्हारकडून त्याचे सर्वस्व हिरावून घेतो. त्यानंतर मालिकेच्या कथानकाचा काळ पाच वर्षांनी पुढे नेला जाणार असून त्यात मनाने खचलेला मल्हार स्वत:चे आयुष्य बरबाद करताना दिसणार आहे.

मल्हारची पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदावनती झाली असून तो पूर्वीसारखा दक्ष, तत्पर आणि सज्जन पोलिस राहिलेला नाही, हे दिसते. तो आता तापट, निष्ठूर आणि प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा देण्यास उत्सुक असलेला पोलिस अधिकारी झाला आहे. मल्हारला आता आपल्या जिवाची पर्वा राहिली नसून तो स्वत:ला संपविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. त्याला कोणाचीच पर्वा राहिलेली नाही. त्याला एक रिव्हॉल्व्हरही बाळगण्याची परवानगी नसते. मल्हार आता जीवनाकडे परतण्याच्या कायमचा दूर जात असलेला दिसत असतानाच कल्याणी परतलेली दिसते.

काय असेल पुढचे कथानक?

आता पाच वर्षांनी सर्व काही बदललेले आहे. कल्याणीही पूर्णपणे नव्या अवतारात दिसेल. या दोघांमधील संबंधही पूर्णपणे बदलल्याचे दिसेल. कल्याणी इतका काळ कुठे होती? ती काय करीत होती? ती मल्हारपासून दूर का राहिली? आणि तिला आता काय हवे आहे? या प्रश्नांची उत्तरे आता काळच देईल. पाच वर्षांनंतरच्या कथानकात आता अवनी (श्रष्ठी माहेश्वरी) या नव्या 25 वर्षीय तरुणीची एंट्री होणार आहे. ती गर्भवती राहिल्याने अहीर तिला टाकून देतो. तिच्यामुळे कथानकाला कशी कलाटणी मिळेल, ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहावी लागेल.

दुसरीकडे, कल्याणी जिवंत नाही, अशी समजूत झाल्यामुळे अनुप्रिया (पूर्वा गोखले) हिने सर्व आशा सोडली आहे. ती आता अधिकच अबोल झाली असून तिच्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण झाला आहे. आपण ज्यांच्या संपर्कात येतो, त्यांचे काहीतरी वाईटच होते, अशी तिच्या मनाची समजूत होते. परिणामी अनुप्रिया ही आऊसाहेबांच्या हातची बाहुली बनते. पण कल्याणीचे पुनरागमन अनुप्रियामध्ये आत्मविश्वास निर्माण करून तिला स्वत:च्या पायावर उभी राहण्यास कारणीभूत ठरेल का? हे बघणेही रंजक ठरेल.

‘तुझसे है राबता’मध्ये मल्हार राणेची भूमिका साकारणारा अभिनेता सेहबान अझीमने या लीपबद्दल सांगितले, “आम्हाला आमचे प्रेक्षक आणि चाहते यांच्याबद्दल विलक्षण प्रेम आहे. किंबहुना ते आमच्यावर करीत असलेल्या प्रेमाच्या वर्षावाने आम्ही भारावून गेलो आहोत. आपल्या सर्वांनाच सर्व गोष्टींचा शेवट गोड व्हावा, असं वाटत असलं, तरी वास्तव हे त्यापेक्षा वेगळं असतं. कल्याणी आणि मल्हार हे छोट्या पडद्यावरील सर्वात लाडक्या जोडप्यांपैकी एक मानलं जातं. ही काळाची उडी प्रेक्षकांना धक्का देणारी ठरेल. पण त्यांना माझी दुसरी बाजू पाहणं आणि स्वत:च्या जिवापेक्षा प्रिय असलेल्या कल्याणीवर गोळी झाडण्याचा निर्णय मी का घेतला, हे जाणून घेण्यास नक्कीच आवडेल. अर्थात प्रेक्षकांना ‘कल-मा’च्या जीवनातील अनेक घडामोडी अद्याप पाहायच्या आहेत, हे मी त्यांना सांगू इच्छितो. आता पाच वर्षांनंतर एका पूर्णपणे नव्या अवतारात कल्याणी परतली आहे. त्यामागील रहस्यही त्यांना पाहायला मिळेल.”

मालिकेत नव्याने एंट्री घेणारी अभिनेत्री श्रष्ठी माहेश्वरी म्हणाली, “इतक्या लोकप्रिय मालिकेतील या महत्त्वाच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी माझी निवड केली, याचा मला खूप आनंद झाला आहे. अवनीची भूमिका ही माझ्यासाठी एक नवं आव्हान आहे. ती एक जिंदादिल तरुणी आहे. मल्हार आणि कल्याणी यांच्या आयुष्यावर ती कसा आणि कोणता परिणाम घडविते, ते पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतील आणि माझ्या प्रवेशावर त्यांची काय प्रतिक्रिया उमटेल हे पाहण्यास मी उत्सुक बनले आहे.”

बातम्या आणखी आहेत...