आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बडे अच्छे लगते हैं 2':‘बधाई हो’ फेम अभिनेते गजराज राव यांनी केले 'बडे अच्छे लगते हैं 2'च्या प्रोमोजचे दिग्दर्शन, पोस्ट शेअर करत नकुल मेहता म्हणाला...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘बडे अच्छे लगते हैं – 2’ ही मालिका 30 ऑगस्ट 2021 पासून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन नव्याने दाखल होत असलेल्या 'बडे अच्छे लगते हैं 2' या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. राम कपूर आणि साक्षी तन्वर स्टारर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेचे हे दुसरे सीझन आहे. यात नकुल मेहता आणि दिशा परमार या मालिकेत मुख्य भूमिका वठवत आहेत. अलीकडेच या मालिकेचे हृदयस्पर्शी प्रोमो रिलीज झाले, जे प्रेक्षकांना खूपच भावले आहेत. विशेष म्हणजे या प्रोमोजचे दिग्दर्शन अभिनेते गजराज राव यांनी केले आहे. बॉलिवूडच्या गाजलेल्या बधाई हो या चित्रपटात गजराज राव यांना प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर पाहिले आहे. नकुल मेहताने या आधी एका चॉकलेटच्या जाहिरातीत गजराज राव यांच्यासोबत काम केलेले आहे.

या निमित्ताने नकुलने आपल्या इन्स्टाग्रामवर गजराज राव यांच्या सोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे व त्यात त्याने गजराज राव यांना ‘मोठा अपवाद’ म्हणून संबोधले आहे. इन्स्टाग्रामवर नकुलने त्यांच्यासाठी एक छोटीशी गोड नोट देखील लिहिली. तो लिहितो, “ही एक अशी इंडस्ट्री आहे, जिथे तुम्ही एकामागून एक कामे करत राहता, वेळेची बंधने पाळता, येथील कामाच्या स्वरूपामुळे प्रत्येक टप्प्यावर जुळणारी नाती एका सामान्य दिनचर्येचा भाग असतात. गजराज राव मात्र त्याला अपवाद आहेत. सुमारे एक दशकापूर्वी आम्ही दोघांनी एका चॉकलेटच्या जाहिरातीत एकत्र काम केले होते त्यानंतर आता माझ्या नव्या टीव्ही मालिकेच्या लाँचसाठी काही प्रोमोजमध्ये मला त्यांचे दिग्दर्शन लाभले.”

तो पुढे म्हणतो, “ते तुम्हाला वेळ देतात, तुमच्याशी छान नातं निर्माण करतात, तुमची मानसिकता जाणून घेतात, एक सुंदर कलाकृती आपण कशी निर्माण करू शकतो याबद्दल चर्चा करतात, शूटिंग करताना असेच काही किस्से ऐकवतात (ते फारच छान असतात), तुम्ही नीट जेवला आहात ना, याची विचारपूस करतात, तुमच्या स्टाफपैकी सगळ्यांची नावे जाणून घेतात, त्यांची प्रतिक्रिया देतात, तुम्हाला प्रोत्साहन देतात, वेगवेगळ्या शक्यता दाखवतात, आणि मग तुम्हाला एक कलाकार म्हणून पूर्ण मान देऊन अलगदपणे आपले काम काढून घेतात. या गोड स्वभावाबद्दल गजराज सर, तुमचे आभार! तुम्ही विचारपूर्वक दिलेल्या भेटवस्तूबद्दलही आभार. काल रात्रीच मी वाचून संपवले, त्याने मला भरपूर खाद्य पुरवले आहे. मला खूप हुरूप वाटतो आहे. आशा आहे, की पुन्हा लवकरच आपण एकत्र काम करू.”

या गोड नोटला उत्तर देताना गजराज राव यांनी त्या पोस्टवर लिहिले, “तू आणि दिशा परमार यांच्याबरोबर काम करायला खूपच मजा आली. या मालिकेतील तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. भविष्यात अनेक प्रोजेक्ट आपण एकत्र करू हीच आशा!”

'बडे अच्छे लगते हैं 2'चे प्रोमोज प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. नकुल आणि दिशा यांची पडद्यावरची केमिस्ट्री खूपच लोभस वाटली आहे. आणि आता या प्रोमोजच्या मागे बॉलिवूड अभिनेते गजराज राव असल्याचे कळल्यानंतर तर प्रोमोजची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...