आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bigg Boss 14 वाद:शोमध्ये मराठी भाषेचा अवमान केल्यानंतर कुमार सानूच्या मुलाने मागितली माफी, म्हणाला - 'मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो, पुन्हा अशी चूक होणार नाही'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलर्स वाहिनीने जान कुमार सानूचा माफी मागतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

कलर्स वाहिनीच्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू या स्पर्धकाने मराठी भाषेची चीड येत असल्याचे वक्तव्य करुन मराठी भाषेचा अवमान केला होता. यावरुन मोठे वादंग उठले होते. त्याच्या या वक्तव्यावरुन मनसे आणि शिवसेना आक्रमक झाले होते. त्यांनी या शोमधून जान सानूची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर Viacom 18 ने आपला माफीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. आता जान सानू यानेदेखील आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. कलर्स वाहिनीने जान कुमार सानूचा माफी मागतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

जानने मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वादंग उठल्यानंतर बिग बॉसच्या घरात जान याला कन्फेशन रुममध्ये बोलवण्यात आले. यावेळी त्याला कोणतीही भाषा, धर्म आणि जात, सांप्रदाय यावर बिग बॉसच्या घरात चर्चा करण्यास मनाई असल्याचं सूचित करण्यात आले. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात सर्वप्रकारच्या भाषा, जाती-धर्माच्या लोकांचे स्वागत केले जाते, असेदेखील ठणकावून सांगण्यात आले. त्यानंतर जानने माफी मागितली.

अडीच मिनिटांच्या व्हिडिओत जान सानू म्हणतोय, “नमस्कार माझे नाव जान कुमार सानू आहे. माझ्याकडून नकळत एक चूक झाली, ज्यामुळे मराठी भाषिकांना आणि त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे. मी मराठी लोकांची मनापासून माफी मागतो. मराठी भाषिकांना वाईट वाटावे, असा माझा हेतू नव्हता. माझ्यामुळे बिग बॉसलाही शरमेने मान खाली घालाली लागली. त्यामुळे बिग बॉसचीही माफी मागतो. अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, याची मी काळजी घेईन”, अशा शब्दांत जान याने माफी मागितली आहे.

  • जान सानू विरोधात अनेकांनी घेतली होती आक्रमक भूमिका

दरम्यान, बिग बॉस शोमध्ये जान कुमार सानू याने मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी बुधवारी (28 ऑक्टोबर) राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 24 तासांच्या आत माफी मागण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली होती. याशिवाय मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांच्यासह शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला होता. यानंतर कलर्स या मनोरंजन वाहिनीने माफीनामा दिला.

“मराठीचा अपमान केलास… आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!”, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.

“जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला”, असे म्हणत अमेय खोपकर यांनी जान सानूला इशारा दिला होता.

इतकेच नाही तर ते पुढे म्हणाले होते, “मुंबईत राहून तर आता तुझे करिअर कसे बनते जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केले नाही ते बरे झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजले”, असे म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला होता.

जर मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला होता.

  • कलर्स वाहिनीने माफीनाम्यात काय म्हटले?

कलर्स वाहिनीने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित झालेल्या प्रकरणी माफी मागितली आहे. मराठीचा अवमान करणारे वक्तव्य वाहिनीच्या एका कार्यक्रमात व्यक्त झाले होते, याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत, असे वाहिनीकडून म्हटले गेले.

या प्रकरणी माफी मागताना कलर्स टीव्हीने पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर 27 ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी मिळाल्या. आम्ही या आक्षेपांची नोंद केली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोलले गेले आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत. मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. शिवाय सगळ्या भाषा सन्मानीय आहेत’, असे या पत्रात नमूद करण्यात आले.

  • काय होते संपूर्ण प्रकरण?

‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. दरम्यान ती राहुलशी मराठीतून संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसली. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे म्हटले.

बातम्या आणखी आहेत...