आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बिग बॉस 14' जान कुमार वाद:मराठी भाषेचा अवमान केल्याप्रकरणी कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे माफीनामा, जान सानूने केले होते मराठी भाषेसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता कलर्स वाहिनीने नमते घेत, आपला जाहीर माफीनामा सादर केला आहे.

बिग बॉस 14 या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेची चीड येते, अशा संदर्भातले वक्तव्य जान कुमारने या शोमध्ये केले आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर मनसे आणि शिवसेनेसह अनेकांनी त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत त्याची या शोमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. मात्र, आता कलर्स वाहिनीने नमते घेत, आपला जाहीर माफीनामा सादर केला आहे.

कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित झालेल्या प्रकरणी माफी मागितली आहे. मराठीचा अवमान करणारे वक्तव्य वाहिनीच्या एका कार्यक्रमात व्यक्त झाले होते, याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत, असे वाहिनीकडून म्हटले गेले आहे.

कलर्स वाहिनीने माफीनाम्यात काय म्हटले?
या प्रकरणी माफी मागताना, कलर्स टीव्हीने पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर 27 ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी मिळाल्या. आम्ही या आक्षेपांची नोंद केली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोलले गेले आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत. मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. शिवाय सगळ्या भाषा सन्मानीय आहेत’, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

  • जान सानू विरोधात अनेकांनी घेतली आक्रमक भूमिका

जान सानूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त केला गेला. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांच्यासह शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला.

“मराठीचा अपमान केलास… आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे!”, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.

“जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला”, असे म्हणत अमेय खोपकर यांनी जान सानूला इशारा दिला आहे.

इतकेच नाही तर ते पुढे म्हणाले, “मुंबईत राहून तर आता तुझे करिअर कसे बनते जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केले नाही ते बरे झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजले”, असे म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला आहे.

जर मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला आहे.

  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. दरम्यान ती राहुलशी मराठीतून संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसली. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे म्हटले.