आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बिग बॉसच्या चौदाव्या सीझनचा ग्रॅण्ड फिनाले नुकताच पार पडला. अभिनेत्री रुबीना दिलैक बिग बॉसच्या चौदाव्या पर्वाची विजेती ठरली आहे. राहुल वैद्यला टक्कर देत रुबीनाने विजेते पदाची ट्रॉफी पटकावली आहे. रुबीनाला ट्रॉफीसह 36 लाख रुपये प्राइज मनीच्या रुपात मिळाले. 3 ऑक्टोबर 2020 ला बिग बॉस 14 चा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. तब्बल 140 दिवस हा शो चालला. बिग बॉसच्या पर्वांमधील सर्वाधिक दिवसांचे हे पर्व ठरले आहे. शोच्या सुरवातीपासूनच रुबीनाने तिच्या दमदार परफॉर्मन्सने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले होते.
पाच स्पर्धकांनी बिग बॉस 14 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यात रुबीना दिलैक, राहुल वैद्य, निकी तांबोली, अली गोनी आणि राखी सावंत यांनी बाजी मारली. मात्र रुबीना दिलैक आणि राहुल वैद्य हे टॉप 2 मध्ये पोहोचले. प्रेक्षकांचे सर्वाधिक वोटस् मिळवत रुबीनाने बिग बॉसच्या 14व्या सीझनच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या कार्यक्रमाची विजेती ठरल्यानंतर दिव्य मराठीशी बोलताना रुबीना म्हणाली की, हा तिच्यासाठी दुहेरी विजय आहे. सोबतच तिने सांगितले की, जिंकलेल्या रकमेतून ती आपल्या गावातील लोकांच्या कल्याणासाठी काही पैसे वापरणार आहे. रुबीना मुळची शिमल्याची आहे.
या पैशाने मी माझ्या गावात पक्का रस्ता तयार करेन
रुबीना म्हणाली, जिंकलेल्या रकमेतून मला माझ्या गावासाठी पक्का रस्ता बांधायचा आहे. माझ्या आईने मला नेहमी शिकवले की, आपण जे काही कमवाले ते समाजातील आणि आपल्या लोकांना देणे आवश्यक आहे. मी माझ्या आईच्या या गोष्टीचे अनुसरण करते. माझ्या गावातील लोकांसाठी पक्का रस्ता आणि वीजेचे माध्यम बनवण्याची माझी इच्छा आहे. गेल्या काही वर्षांपासून मी माझ्या गावात राहायला लागले आहे. मला खात्री आहे की, मी तिथल्या लोकांसाठी नक्कीच काहीतरी करेन.
सलमान खानकडून दोनदा विजय कन्फर्म केला
जेव्हा सलमान खानने माझे नाव विजेता म्हणून घोषित केले, तेव्हा मला विश्वास बसला नाही. मी दोनदा त्यांना विचारले आणि मग मला खात्री पटली. त्यावेळी मी नर्व्हस नव्हते, परंतु निश्चितच समाधान होते की मी 140 दिवसांचा प्रवास केला. मी 'बिग बॉस' हा शो कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे शोचा पॅटर्न कसा आहे हे मला माहिती नव्हते. पण सहभागी होताना नक्कीच शोच्या अंतिम टप्प्यात जाण्याची इच्छा होती. ट्रॉफी जिंकणे हे मी माझ्या नशिबावर सोडून दिले होते. ते म्हणतात, ना जेव्हा आपण प्रामाणिक मनाने काम करता तेव्हा आपण नक्कीच यशस्वी होतो. माझ्या बाबतीतही तेच घडले. लोकांनी माझ्या विजयाचे कौतुक केले आणि मला हे कौतुक ट्रॉफीच्या रूपात मिळाले. मी माझ्या चाहत्यांची नेहमी आभारी राहीन.
माझ्या प्रामाणिकपणामुळे मी हा शो जिंकले
जेव्हा मला या शोची ऑफर आली होती, तेव्हा मी हा खेळ खेळू शकले हा आत्मविश्वास माझ्यात नव्हता. पण मला माझ्या प्रामाणिकपणावर खूप विश्वास होता. माझा प्रामाणिकपणामुळेच मी शेवटपर्यंत या शोमध्ये टिकून राहिले आणि यशस्वी झाले, ज्याचा मला खूप अभिमान आहे.
दुहेरी विजय - एका बाजूला शोची ट्रॉफी आणि दुसरीकडे अभिनवशी माझ्या नात्याचा विजय
या विजयात माझा पती अभिनव शुक्लाची मोठी भूमिका आहे. या संपूर्ण प्रवासात त्याने मला साथ दिली. जेव्हा विजेता म्हणून माझ्या नावाची घोषणा झाली, तेव्हा सर्वप्रथम मी अभिनवकडे पाहिले, तो नाचत होता. त्याचा चेहरा पाहून एक वेगळेच समाधान वाटले. या शोमुळे आमच्या नात्याला नवीन वळण मिळाले आहे. हा माझा सर्वात मोठा विजय आहे. हा माझ्यासाठी दुहेरी विजय आहे. एकीकडे शोची ट्रॉफी आणि दुसरीकडे अभिनवसोबत असलेल्या माझ्या नात्याचा विजय. आयुष्याचा हा क्षण नेहमीच खास असेल.
धर्मेंद्र सरांकडून माझ्या आणि अभिनवच्या नात्याबद्दल ऐकून छान वाटले
धर्मेंद्र सरांकडून (ज्येष्ठ अभिनेते) अभिनव आणि माझ्या नात्याबद्दल ऐकून खूप आनंद झाला. ते आपल्या अनुभवावरून आम्हाला समजावून सांगत होते, ते माझ्यासाठी खूप अनमोल होते. त्यांचे बोलणे मनाला स्पर्श करुन गेले. हेमाजी (हेमा मालिनी) यांच्याशी असलेल्या संबंधांच्या अनुभवावरून त्यांनी आम्हाला सल्ला दिला. त्यांचा सल्ला आमच्यासाठी अतिशय मौल्यवान आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.