आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्रीला कोरोनाची लागण:रूग्णालयात दाखल असलेल्या मोहेना कुमारीने कथन केला आपला अनुभव, लाइव्ह सेशनमध्ये सहकलाकाराला बघून अश्रू झाले अनावर

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोहेनाच्या कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मोहेना कुमारी हिला कोरोनाची लागण झाली. तिच्यासह कुटुंबातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मोहेनाची प्रकृती ठीक असून तिने इंस्टा लाइव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. रुग्णालयातूनच तिने हा व्हिडीओ केला असून गेल्या सहा दिवसांत काय काय घडले, याबद्दल तिने सांगितले. मोहेनाने सांगितले की, तिच्या शारीरिक स्वास्थ्यापेक्षा मानसिक स्वास्थावर खूप जास्त परिणाम झाला आहे. यावेळी रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील तिचा सहकलाकार गौरव वाधवाने हे सेशल जॉईन केले, तेव्हा मोहेना त्याला बघून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेऊ शकली नाही आणि तिला अश्रू अनावर झाले.  

6 दिवसानंतरही टेस्ट निगेटिव्ह आली नाही

लाइव्ह चॅटमध्ये मोहेनाने सांगितले की, रुग्णालयात दाखल होऊन तिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना 6 दिवस झाले आहेत. पण अद्याप कुणाचीही टेस्ट निगेटिव्ह आलेली नाही. तिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण कशी झाली, याविषयीदेखील तिने यावेळी सांगितले.

मोहेनाने सांगितल्यानुसार, तिच्या सासूला सर्वात आधी ताप आला होता. मात्र त्यांचा पहिला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला.  सर्वप्रथम सगळ्यांना हा सामान्य फ्लू असल्याचे वाटले. पण ताप वाढतच गेल्याने सासूची दुस-यांदा टेस्ट करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आणि येथे सगळ्यांची टेस्ट झाली. दुसऱ्यांदा चाचणी केल्यावर सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे तिने व्हिडीओत सांगितले.  घरातील सदस्यांकडूनच इतरांना कोरोनाची लागण झाल्याचे ती म्हणाली. 

मोहेना म्हणाली, “शारीरिक स्वास्थ्यापेक्षा मानसिक स्वास्थावर खूप जास्त परिणाम होतो. सहा दिवसांपासून आम्ही रुग्णालयात आहोत. अजून आमचा रिपोर्ट पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह झाला नाही. या संपूर्ण अनुभवावरून मी इतकंच लोकांना सांगू इच्छिते की मनाचे स्वास्थ जपा. ते ठीक असले की परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाऊ शकता.”  

गौरवला पाहून मोहेनाला अश्रू अनावर

मोहेना आपल्या चाहत्यांसोबत कोविड - 19 शी लढा देतानाचा अनुभव शेअर करत होती. यावेळी अभिनेता गौरव वाधवा या लाइव्ह सेशनमध्ये सहभागी झाला. त्याला बघताच मोहेनाला अश्रू अनावर झाले होते. मोहेनाने सांगितल्यानुसार, कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ती खूप घाबरली होती. पण आता तिने सल्ला दिला की, यामुळे घाबरुन जाऊ नका. 

रुग्णालयात असा आहे मोहेनाचा डाएट

गौरव वाधवासोबत बोलताना मोहेनाने रुग्णालयातील तिच्या आहाराविषयीही सांगितले. तिथे येथे जास्तीत जास्त फळे, काढा, आणि घरातील सामान्य जेवण घेत आहे. सोबतच कोरोनापूर्वीचे सामान्य आयुष्य, सहकलाकार, आणि मित्रांची आठवण काढत आहे.

कुटुंबातील बहुतेक सदस्यांना कोरोनाची लागण

उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि आध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांची मोहेना सून आहे. 15 ऑक्टोबर 2019 रोजी सतपाल यांचे धाकटे पुत्र सुयश रावत यांच्याबरोबर तिचे लग्न झाले. मोहेना ही रीवाचे महाराजा पुष्पराज सिंग जुदेव यांची मुलगी आहे. कुटुंबात मोहेनाव्यतिरिक्त तिचे पती सुयश रावत, सासरे सतपाल महाराज, सासू अमृता रावत, जाऊ आराध्या आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय त्यांच्या घरात काम करणा-या 17 सदस्यांचीही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  

मोहेना  'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणूनही दिसली आहे. रेमो डिसोझा दिग्दर्शित ‘एबीसीडी: एनी बडी कॅन डान्स’ या चित्रपटातही तिने काम केले आहे. तिने ‘डान्स इंडिया डान्स’ या शोमधील स्पर्धकांसाठी कोरोग्राफीदेखील केली आहे. लग्नानंतर तिने तिच्या अभिनयाच्या करिअरला राम-राम ठोकला आहे.

बातम्या आणखी आहेत...