आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भटनागर हिचे सोमवारी (7 डिसेंबर) कोरोनामुळे निधन झाले. तिच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दिव्याची मैत्रीण आणि अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिला तिच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. देवोलिनानेच दिव्याला तिच्या कारमधून रुग्णालयात पोहोचवले होते. आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत दिव्याचा पती गगनवर गब्रू याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवोलिनाच्या म्हणण्यानुसार, दिव्याचा मृत्यू फक्त कोविड 19 मुळे नाही तर तिच्या पतीने केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळामुळे झाला आहे.
दिव्याच्या नव-यावर देवोलिनाने व्यक्त केला संताप
सात मिनिटांच्या व्हिडिओत देवोलिना म्हणतेय, 'मी आज माझी सर्वात जवळची मैत्रीण दिव्या भटनागर हिच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे, ती मला कायमची सोडून निघून गेली आहे. मागील 10 वर्षांत मी तिला कुणालाही दुखवताना पाहिले नाही. उलट लोकांनीच तिचा वापर केला आणि तिला यातना दिल्या. विशेषतः नात्यांमध्ये. एकदा नात्यात फसवणूक झाली की दुसऱ्यांदा चूक करण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यावेळी जो कोणी व्यक्ती खांदा देतो त्याच्यासोबत मुली पुन्हा नातं जोडतात. दिव्या खूपच निरागस होती. आणि माझ्यापेक्षा हजारपटीने इमोशनल होती.'
देवोलिना म्हणाली, 'मी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता. मी तिचा पती गगन गब्रूबद्दल बोलतेय. त्या व्यक्तीने दिव्याचा शारीरिक व मानसिक छळ केला. दिव्याने स्वीकारावे यासाठी त्याने विनवणी केली आणि तिच्या या निर्णयामुळे मी चार वर्षे तिच्यापासून लांब होते”, असे देवोलिना या व्हिडिओत म्हणाली.
'तू तुरुंगात जाशील'
दिव्याने आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन 2019 मध्ये गगनसोबत लग्न केले होते. शिमलामध्ये गगनविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो जामिनावर सुटल्याचा खुलासाही देवोलिनाने केला.
'मी तुझ्याविरोधात पुरावे घेऊन येईल'
व्हिडिओत देवोलिनाने सांगितले, निधनाच्या काही दिवसांपूर्वी दिव्याने मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये गगनविरोधात NC दाखल केला होता. करवा चौथच्या दिवशी गगनने दिव्याला मारहाण केली होती. आणि तिचे दागिने चोरले होते. देवोलिना म्हणाली, 'हे फक्त आरोप नाहीत, तर मी तुझ्याविरोधात पुरावे घेऊन येईल. तू पुन्हा कारागृहात जाशील. कारण तू दिव्याचा अतोनात छळ केलास. देव तुला कधीच माफ करणार नाही. तू आणि तुझी आई कारागृहात सडाल', असे ती म्हणाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.