आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Director Mahesh Tillekar Reaction On Bigg Boss 14 Contestant Jaan Sanu Over His Statement On Marathi Language

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14:'महाराष्ट्रात राहून तुला मराठीची लाज का वाटते?', दिग्दर्शक महेश टिळेकरांचा जान कुमार सानूला सवाल

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत राहून याला मराठी भाषेबद्दल इतका राग आहे, तर याने महाराष्ट्रात तरी का रहावे?, असे महेश टिळेकरांनी म्हटले आहे.

बिग बॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोचे 14 वे पर्व सध्या छोट्या पडद्यावर सुरु आहे. या शोमध्ये यंदाही वाद बघायला मिळत आहेत. सध्या घरात राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात घमासान सुरु आहे. अलीकडेच झालेला वादादरम्यान जान कुमारने मराठी भाषेचा अवमान केला. निक्कीने जानसोबत मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, माझ्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करु नको, बोलायचे असल्यास हिंदीतून बोल, मराठी भाषा ऐकून मला प्रचंड चीड येते, असे वक्तव्य जानने केले. त्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यावर मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

''महाराष्ट्रात राहून या कलाकारांना मराठीची लाज का वाटते? प्रसिद्ध गायक कुमार सानू मुंबईत राहतात, मराठी लोकांनीही त्यांची गाणी ऐकली. त्यांना मोठे करण्यात महाराष्ट्राचा वाटा आहेच, पण कुमार सानू यांचा हा दिवटा मुलगा जान सानू सध्या बिग बॉस मध्ये सहभागी आहे, तिथे तो त्याच्याशी मराठीत बोलणाऱ्या सहकलाकाराला मराठी बोलू नको म्हणून सांगतोय. मुंबईत राहून याला मराठी भाषेबद्दल इतका राग आहे तर याने महाराष्ट्रात तरी का रहावे?'', असा संतप्त सवाल महेश टिळेकरांनी केला आहे.

  • शिवसेना आणि मनसेने केली जान सानूची शोमधून हकालपट्टी करण्याची मागणी

जान सानूच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे नेते अमेय खोपकर आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेत, त्याला या घरातून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

'मुंबईत राहून तर आता तुझे करिअर कसे बनते जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केले नाही ते बरे झाले, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजले'', असे ट्विट करत अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला इशारा दिला आहे.

दुसरीकडे, मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. दरम्यान ती राहुलशी मराठीतून संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसली. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे म्हटले.

बातम्या आणखी आहेत...