आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण:आरोपी अभिनेता पर्ल व्ही पुरीला पाठिंबा देताना दिव्या खोसला कुमारने पीडितेची ओळख उघड केली, पीडितेच्या आईवडिलांचा फोटोदेखील शेअर केला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्याने तिच्या पोस्टमध्ये पीडित मुलीच्या आईवडिलांच्या नात्यावर भाष्य केले

टीव्ही अभिनेता पर्ल व्ही पुरी हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सध्या पोलिस कोठडीत आहे. दरम्यान, ग्लॅमर जगातील काही सेलिब्रिटी त्याला पाठिंबा देताना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. पर्लला समर्थन देताना निर्माती एकता कपूरने पीडितेच्या आईसोबत झालेल्या संभाषणाचा ऑडिओ सार्वजनिक केला होता. आता पर्लसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम करणार्‍या दिव्या खोसला कुमारने पीडित मुलीच्या आई-वडिलांची ओळख उघड केली आहे.

दिव्याने तिच्या पोस्टमध्ये पीडित मुलीच्या आईवडिलांच्या नात्यावर भाष्य केले
पर्ल व्ही पुरीच्या प्रकरणात अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही. त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. कायद्यानुसार बलात्कार पीडितेची ओळख किंवा तिच्याशी संबंधित कोणतीही माहिती उघड केली जाऊ शकत नाही, पण दिव्या खोसला कुमार हिने पीडित मुलीच्या आईवडिलांच्या नावासह त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच दिव्याने लिहिले...

  • अतिशय हैराण करणारे आणि लज्जास्पद काम... मी तुम्हाला काही व्यक्तींचा परिचय करून देते… ही महिला एक अभिनेत्री आहे. तर हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी अभिनेता पर्ल पुरीवर त्यांच्या 5 वर्षाच्या मुलीचे शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे सगळं एका या मालिकेच्या सेटवर घडले, ही मालिका दोन वर्षापूर्वी बालाजी टेलीफिल्म्सने प्रोड्यूस केली होती. हे दोघेही वेगळे झाले आहेत आणि आता ते मुलीच्या कस्टडीसाठी भांडत आहेत.
  • मागील दोन वर्षापासून मुलगी तिच्या वडिलांसोबत राहतेय. पीडितेच्या आईविरोधात तक्रार दाखल करताना वडिलांनी सांगितले की, मुलीची आई ही मुलीला घेऊन सेटवर जात असे आणि तिथे मुख्य भूमिकेतले अभिनेते तिचे शोषण करत असत. त्यामुळे मुलगी तिच्या आईसोबत सुरक्षित नाही. मला असं वाटतंय की या कहाणीसाठी या व्यक्तीला फिल्मफेअर बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड मिळाला पाहीजे.
  • आता पोलिसांनी पर्लला अटक केली आहे…मला हे जाणून घ्यायचंय, जेव्हा 2019 मध्ये हा गुन्हा दाखल झाला होता, तेव्हा का नाही पोलिसांनी पर्लला अटक केली ? कारण यात स्पष्टपणे लिहिले की जेव्हा मुलीचे शोषण झाले तेव्हा ती तिच्या आईसोबत होती. एफआयआरमध्ये पर्लचे नाव कुठेच नाही. मी स्वतः तो एफआयआर वाटला आहे. जेव्हा पर्लच्या आईने मला मदत मागितली तेव्हा त्यांनी तो मला पाठवला होता.
  • एकता कपूरसोबत झालेल्या संभाषणात मुलीची आई स्पष्टपणे सांगतेय की, मुलीच्या वडिलांची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही. त्याने तिला कित्येकदा शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे याचे अनेक पुरावे सुद्धा आहेत. तिने स्पष्टपणे सांगितले की यात पर्लचा काही दोष नाही आणि सेटवर असा कोणताच प्रकार झालेला नाही.

दोन वर्षांची होऊ शकते शिक्षा
बलात्कार पीडित मुलगी किंवा महिलेची ओळख सांगणे हा भादवी कलम 228 ए अंतर्गत गुन्हा आहे. कलम 376, 6 376 ए, 376 बी, 376 सी, 376 डी, 376 जी अंतर्गत पीडितेचे नाव उघड केल्यास किंवा प्रकाशित केल्यास दोन वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड ठोठावला जाऊ शकते. कायद्यानुसार पीडितेचे घर, कुटुंब, मित्र किंवा तिच्याशी संबंधित कोणतीही माहिती उघड करता येत नाहीय

(या प्रकरणात पीडित मुलगी अल्पवयीन आहे, म्हणून दिव्या खोसला कुमारची पोस्ट एडिट करुन आम्ही पालकांची नावे व त्यांची ओळख काढून टाकली आहे.)

बातम्या आणखी आहेत...