आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेली प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेत्री सुगंधा मिश्रा वादात सापडली आहे. गुरुवारी तिच्याविरोधात कोरोना सेफ्टी प्रोटोकॉल अंतर्गत पंजाबच्या फगवाडा येथे एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तिच्या लग्नसमारंभाला नियमापेक्षा अधिक लोक जमले होते, असा आरोप आहे. सुगंधाच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे. सुगंधाशिवाय संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सुगंधा 9 दिवसांपूर्वीच कॉमेडियन डॉ. संकेत भोसलेसोबत विवाहबद्ध झाली होती. 26 एप्रिल रोजी फगवाडा येथील क्लब कबाना रिसॉर्टमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता. लग्नाच्या आदल्या दिवशी पोहोचलेल्या सर्व पाहुण्यांना 24 तासांसाठी क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर सुगंधाची आई सविता यांनी सांगितले होते की, 'लग्न आधी डिसेंबरमध्ये होणार होते, मात्र कोरोनामुळे वारंवार लग्नाची तारीख बदलण्यात आली होती. कुटुंब लग्नसोहळा मोठा करण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु कोरोनामुळे कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत आता लग्नसोहळा होणार आहे. लग्नात केवळ दोघांच्या कुटुंबातील जवळचे लोक सहभागी होतील आणि यावेळी कोविडच्या सर्व नियमांचे पालन होईल,' असे सविता मिश्रा यांनी सांगितले होते.
मात्र आता लग्नाच्या नऊ दिवसांनंतर सुगंधाविरूद्ध फगवाडाच्या सदर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, सुगंधाच्या लग्नात 100 हून अधिक पाहुणे सहभागी झाले होते. मात्र सरकारकडून लग्नसमारंभासाठी 40 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. ASI रघुवीर यांनी सांगितले की, जीटी रोडवरील क्लब कबाना येथे विवाह सोहळ्यासाठी गर्दी जमा केल्याबद्दल सुगंधा मिश्रा, वर पक्ष आणि हॉटेल व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोणलाही याप्रकरणी अटक झालेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.