आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अलीकडेच मुंबईच्या डॉ. नेहा शाह या कौन बनेगा करोडपती 12 या शोच्या चौथ्या करोडपती ठरल्या आहेत. नेहा मागील 20 वर्षांपासून या शोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत होत्या. यंदा त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी एक कोटींची रक्कम या शोमधून जिंकली. जिंकलेल्या रकमेतून गरीबांच्या उपचारांसाठी लाइफ सपोर्ट सिस्टम खरेदी करण्याची त्यांची इच्छा आहे. नेहा यांच्यापूर्वीही अनेकजण या शोमध्ये सहभागी होऊन कोट्यधीश बनले आहेत. एकीकडे काही जणांनी या रकमेतून नवीन व्यवसाय सुरु केला, तर काहींनी मात्र संपूर्ण पैसे गमावले आणि आता पुन्हा हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत आहे. एक नजर टाकुया मागील काही पर्वातील विजेत्यांवर-
2000 मध्ये कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर बसलेले हर्षवर्धन नवाथे त्यावेळी फक्त 27 वर्षांचे होते. ते पहिल्या पर्वाचेच नव्हे तर केबीसीच्या इतिहासातील पहिले करोडपती होते. हर्षवर्धन नवाथे यांनी करोडपती बनल्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन एमबीए पूर्ण केले. ते आज बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये विपणन विभागात उच्च पदावर कार्यरत आहे. गेम शो मध्ये ते जेव्हा सहभागी झाले होते तेव्हा आयएएस बनण्याचे त्यांचे लक्ष्य होते. परंतु, करोडपती बनल्यानंतर त्यांचे अवघे जीवनच बदलले. हर्षवर्धन यांनी मराठी टीव्ही कलाकार सारिका हिच्याशी विवाह केला. अजूनही हर्षवर्धन यांचे राहणीमान मध्यमवर्गीयांसारखेच आहे. त्यांना दोन मुलं आहेत.
2001 मध्ये केबीसी ज्युनिअरमध्ये सहभागी झालेल्या रवी मोहन सैनीने आपल्या ज्ञानाने सर्वांना हैराण केले होते. रवीने सर्व 15 प्रश्नांची अचुक उत्तरे देत 1 कोटी रुपये जिंकले होते. ज्युनिअर केबीसीमध्ये सहभागी झालेला रवी त्यावेळी दहावीत होता. त्याने पुढे सिव्हिल सर्विसेसची परीक्षा पास केली. रवी आता आयपीएस आहे.
कौन बनेगा करोडपती शोमधून देशातील पहिली महिला करोडपती बनलेली राहत तस्लीम या शोच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. शोमध्ये विजेती ठरल्यानंतर राहतने झारखंडच्या गिरिडीह येथे कपडयांचा बिझनेस सुरू केला. आज राहत एका गार्मेंट शोरुमची मालकीण आहे.
मोतिहारी, बिहारचा रहिवासी सुशील कुमारने 'कौन बनेगा करोडपती'च्या पाचव्या पर्वात सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन 5 कोटी रुपये जिंकले होते. तो जेव्हा या शोमध्ये भाग घेण्यास पोहोचला तेव्हा तो मोतिहारीमध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याला 6 हजार रुपये पगार होता. मात्र शोमध्ये मोठी रक्कम जिंकल्यानंतर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. केबीसीत जिंकल्यानंतर सुशील ग्रामीण विकास मंत्रालयाचा ब्रँड अॅम्बेसेडर झाला. मात्र, त्याची लोकप्रियता फार काळ टिकू शकली नाही. त्याला व्यसन जडले आणि तो जिंकलेल्या रकमेचा योग्य वापर करु शकला नाही.
केबीसीदरम्यान सुशील कुमारने सांगितले होते, की त्याला सिव्हिल परीक्षेची तयारी करायची आहे आणि त्यासाठी दिल्लीला जायचे आहे. परंतु त्याचे हे स्वप्नसुध्दा अर्धे राहिले. सुशील कुमारने पाचवे पर्व जिंकले तेव्हा त्याला 5 कोटी रुपये मिळाले होते. परंतु इनकम टॅक्स कापून त्याच्या हातात केवळ 3.6 कोटी रुपये आले. या रक्कमेमध्ये त्याने काही पैसे आपल्या घरासाठी तर काही भावांच्या व्यवसायासाठी खर्च केले. उरलेले पैसे त्याने बँकेत जमा केले, त्या पैशांच्या व्याजावर त्याच्या घराचा उदरनिर्वाह चालू होता. मात्र सुशीलकडे आता केवळ थोडीच रक्कम शिल्लक राहिली आहे. सध्या सुशील हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याचे सांगितले जाते.
सहाव्या सिझनमध्ये सुनमीत कौर यांनी 5 करोड रुपये जिंकले होते. सुनमीत यांनी फॅशन डिझायनिंगची पदवी घेतली होती. मात्र सासरच्यांनी त्यांना करिअर करण्याची परवानगी दिली नव्हती. म्हणून त्यांनी घरातून टिफिन सेंटर सुरु केले होते. मात्र त्यात त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. उदरनिर्वाहासाठी त्यांनी मुलांना ट्युशन शिकवणे सुरु केले होते. शोमध्ये पाच कोटी रुपये जिंकल्यानंतर सुनमीत यांनी स्वतःचा फॅशन ब्रॅण्ड सुरु केला असून आजही त्या याच्याशी जुळलेल्या आहेत.
पेशानं इतिहासाचे शिक्षक असलेले ताज मोहम्मद रंगरेझ सातव्या सिझनमध्ये एक कोटी रुपये जिंकले. हे पैसे त्यांनी मुलीच्या डोळ्यांच्या उपचारांसाठी तसंच घर विकत घेण्यासाठी वापरले, आणि उरलेल्या पैशांमधून त्यांनी 2 अनाथ मुलींचे लग्न करुन दिले.
दिल्लीच्या या दोन्ही भावांनी केबीसीमधली आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त रक्कम जिंकली. आठव्या सीझनमध्ये या दोघांनी 7 कोटी रुपये जिंकले होते. दहा वर्षांपासून हे दोघे या शोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत होते. 2014 मध्ये त्यांना ही संधी मिळाली होती. जिंकलेल्या या पैशांमधून त्यांनी आपल्या आईच्या कॅन्सरवर उपचार केले, तसेच स्वत:चा व्यवसायही सुरु केला. त्यांच्या व्यवसायाचे टर्नओव्हर आता कोटींमध्ये आहे.
केबीसी 9 मध्ये अनामिका मजूमदार यांनी 1 कोटींची रक्कम जिंकली होती. अनामिका एक कोटी जिंकून 7 कोटींच्या जॅकपॉटसाठी कॉलिफाय झाल्या होत्या. पण त्यांनी प्रश्नाचे उत्तर न देता शोमधून क्वीट करण्याचा निर्णय घेतला होता. दोन मुलांची आई असलेल्या अनामिक सामाजिक सेविका असून त्या 'फेथ इन इंडिया' नावाची एनजीओ चालवतात.
केबीसी 10 मध्ये सहभागी झालेल्या बिनीता जैन यांनी 1 कोटींची रकम जिंकली होती. या पैशांतून त्यांनी आपल्या घरची परिस्थिती सुधारली. बिनीता आता गुवाहाटीच्या एका कोचिंग सेंटरमध्ये शिक्षिका आहेत.
याशिवाय केबीसीच्या 11 व्या पर्वात सनोज राज, अजीत कुमार, बबीता ताडे आणि गौतम कुमार झा हेदेखील करोडपती ठरले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.