आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टँडअप कॉमेडियन सुनील पाल याच्या विरोधात मुंबईच्या अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सुनील पालने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्याने कोरोना काळात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर आक्षेपार्ह टीका केली होती. सुनील पालने डॉक्टरांची तुलना राक्षसांशी केली होती.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत सुनीलने म्हटले होते, 'डॉक्टर देवाचे एक रुप असते, मात्र 90 टक्के डॉक्टर राक्षस आहेत आणि ते रुग्णांना घाबरवत आहेत. ते गरीब रुग्णांची काळजी घेत नाहीत. कोविडच्या नावावर लोकांना त्रास दिला जातोय. बेड नाही, प्लाझ्मा नाही, औषधे नाहीत, म्हणून लोकांना घाबरवले जात आहे.'
सुनील पाल व्हिडिओत पुढे म्हणाला होता की, 'लोकांना कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगून रुग्णालयात दाखल केले जात आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नावावर लाखो रुपयांचे बिल बनवले जात आहे. इतकेच नाही तर रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचे बॉडी पार्ट्स काढून त्यांची तस्करी केली जात आहे.'
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुनील पालने याबाबत माफीसुद्धा मागितली होती. 'मी सर्व डॉक्टरांना उद्देशून बोललो नव्हतो. मात्र माझ्या वक्तव्यामुळे डॉक्टरांना त्रास झाला असल्यास मी माफी मागतो आणि माझे शब्द परत घेतो. डॉक्टर वास्तवात देवाचे एक रुप आहे,' असे सुनील पालने आपल्या माफीनाम्यात म्हटले होते. मात्र एका डॉक्टरने पोलिसांकडे त्याच्या विरोधात आता FIR दाखल केली आहे.
अंधेरी पोलिसांनी डॉक्टर सुष्मिता भटनागर यांच्या सांगण्यानुसार सुनील पालच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. डॉक्टर सुष्मिता भटनागर या एसोसिएशन ऑफ मेडिकल कंसल्टेंट्सच्या प्रेसिडेंट आहेत. सुनीलच्या विरोधात भारतीय दंड संहिता (आईपीसी) कलम 500 (मानहानी) आणि कलम 505 (2) (सार्वजनिक दुराचार)नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एफआयआर दाखल केल्यानंतर ई-टाइम्सशी बोलताना सुनील पाल म्हणाला, 'मी माझ्या व्हायरल व्हिडिओवर नंतर माफी सुद्धा मागितली होती. जर मी त्या व्हिडिओमध्ये जे बोललो आहे याचे वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो. पण मी जी टीका केली त्यावर ठाम आहे. कारण डॉक्टर्सना देवासमान मानले जाते. पण सध्याच्या कठीण काळात गरीब लोकांची फतवणूक केली जात आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये एवढेच म्हणालो आहे की, 90 टक्के डॉक्टर्सनी राक्षसांचे कपडे घातले आहेत तर फक्त 10 टक्के डॉक्टर्स हे लोकांची सेवा करून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. जे डॉक्टर्स प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत त्यांना याबाबत अजिबात वाईट वाटणार नाही.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.