आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खुलासा:संगीतकार जतिन-ललित म्हणाले, 'फिर भी दिल है हिंदुस्तानी’चं  टायटल साँग तयार करण्यासाठी शाहरूख खानने एका रात्री आम्हाला डांबून ठेवले होते

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता ‘प्रो-म्युझिक काऊंटडाऊन’मध्ये जतिन-ललित अनेक किस्से शेअर करणार आहेत.

झी टीव्हीवर ‘प्रो-म्युझिक काऊंटडाऊन’ या सांगीतिक कार्यक्रमाच्या आगामी भागात नामवंत संगीतकार जतिन-ललित ही जोडी बॉलिवूडमधील काही खास गुपिते उघड करणार आहेत. किंबहुना या संगीतकार जोडीने ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ या चित्रपटाचे संगीत देतानाच्या आठवणी सांगताना शाहरूख खानशी संबंधित एक धक्कादायक किस्सा कथन केला आहे.

सिध्दार्थशी गप्पा मारताना त्यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या शीर्षकगीतासाठी त्यांना सुयोग्य संगीतरचना जमत नव्हती. या शीर्षकगीताच्या चालीबद्दल ते बरीच चर्चा करीत होते, तेव्हा त्यांना सुपरस्टार शाहरूख खानच्या व्यक्तिमत्त्वातील सर्जनशील बाजूची माहिती समजली. त्यांनी सांगितले की एका रात्री शाहरूख खानने आमच्यासह सर्व वादकांना एका स्टुडिओत कोंडून ठेवले आणि आम्ही जोपर्यंत शीर्षकगीताला चाल लावीत नाही, तोपर्यंत आम्हाला त्याने बाहेर पडू दिले नाही. ही आठवण ऐकून प्रेक्षकांना धक्काच बसेल, हे निश्चित.

यासंदर्भात संगीतकार ललित पंडितने सांगितले, “फिर भी दिल है हिंदुस्तानी चित्रपटाच्या शीर्षकगीतासाठी सुरेल आणि चटपटीत संगीतरचना आम्हाला सुचत नव्हती. हे गीत प्रेक्षकांना सहज गाता येईल, अशा प्रकारची चाल त्याला अपेक्षित होती. पण आम्ही सर्जनशील ब्लॉकमध्ये अडकलो होतो. शाहरूख खानबरोबर मला काम करायला फार आवडतं, याचं कारण तो आपल्या कामाशी पूर्णपणे कटिबध्द असतो आणि अशीच सर्जनशीलता अन्य कर्मचारी आणि कलाकारांकडूनही दाखविली जावी, अशी त्याची अपेक्षा असते. या चित्रपटासाठी संगीत देत असताना त्याने एका रात्री आम्हाला त्या स्टुडिओत कोंडून ठेवलं आणि आमच्या घरी निरोप पाठविला की आम्हाला घरी येण्यास उशिर होईल. आम्ही या शीर्षकगीतासाठी त्याच रात्री चाल लावली पाहिजे, यावर तो ठाम होता.”

त्याला दुजोरा देताना जतिन पंडित म्हणाले, “पण त्या रात्री आम्हाला संगीत देताना खूपच धमाल आली. सुरुवातीला आम्हाला धक्का बसला खरा आणि जावेदजींनी (कवी जावेद अख्तर) यांनीही त्याला सांगितलं की गाणी अशा प्रकारे बनत नाहीत, त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. पण शाहरूख खान आणि जूही चावला हे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. अखेरीस त्या रात्री आम्ही ब-याच विचारानंतर गाण्याचा मुखडा तयार केला आणि सा-या गाण्याचं सार हे त्या मुखड्यातच साठलेलं आहे. त्यानंतर आम्हाला ही चाल सुरळीतपणे सुचत गेली. आज मी त्या रात्रीची आठवण काढतो, तेव्हा आम्ही त्या रात्री या गाण्याला ही चाल लावू शकलो, याचा मला आनंद वाटतो.”