आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौन बनेगा करोडपती:ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राने सांगितले भाला फेक खेळ निवडण्यामागचे कारण, म्हणाला - काकांमुळे खेळाकडे वळलो

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काकांमुळे खेळाकडे वळला नीरज

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपतीमध्ये या शुक्रवारच्या शानदार शुक्रवार विशेष भागात ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा आणि पी आर श्रीजेश हे गेस्ट म्हणून सहभागी होणार आहेत. खेळाडू म्हणून आपल्या जीवनात आलेल्या चढ-उतारांचा अनुभव आणि काही गंमतीशीर किस्से ते ऐकवतील. इतकेच नाही, तर या भागात आंतरराष्ट्रीय वर्ल्ड अॅथलिट रँकिंगमध्ये 2021 साली दुसर्‍या स्थानी असलेल्या नीरज चोप्राने तो भाला फेक या खेळाकडे कसा वळला हेदेखील सांगितले.

काकांमुळे खेळाकडे वळला नीरज
नीरज चोप्रा म्हणाला, “मी 13-14 वर्षांचा होतो, तेव्हा मी खूपच लठ्ठ होतो. मी मैदानी खेळ खेळले पाहिजे असा माझ्या काकांचा आग्रह होता. त्यांनी तर मला खेळ आणि अभ्यास यात निवड करण्यास सांगितले आणि काकांना माझा अभिमान वाटेल असा विचार करून मी माझी पसंती अभ्यासाला दिली. त्यावर ते म्हणाले की, मी किती अभ्यास करतो, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे, त्यामुळे मला खेळाची निवड करण्याचे त्यांनी सुचवले. जेव्हा त्यांनी मला स्टेडियममध्ये पाठवले, तेव्हा मी कोणताही खेळ खेळू शकेन याची शाश्वती मला वाटत नव्हती. मी तिकडे फक्त वजन कमी करण्याच्या उद्देशाने गेलो होतो. हे स्टेडियम माझ्या गावापासून 15-16 किमी. दूर होते आणि मी बसने जा-ये करत असे.'

नीरज पुढे म्हणाला, 'बस स्टेडियमच्या 2 किमी अलीकडे थांबत असे आणि तेथून मला पुढे चालत जावे लागे. एखाद-दोन महिन्यात माझा फिटनेस सुधारला. त्या स्टेडियममध्ये अनेक खेळ होते. मी तेथे माझ्याहून मोठ्या खेळाडूंना भाला फेकताना बघत असे. फेकलेला भाला दूरवर जाऊन जमिनीत रुतायचा, ते मला बघायला खूपच आवडायचे आणि वाटायचे की हा खेळ आपल्याला खेळायला आवडेल. मी तो खेळ खेळू लागलो आणि मला त्यात मजा येऊ लागली.”

देशाचे प्रतिनिधित्व करु शकेल असे वाटले नव्हते

तो पुढे म्हणाला, “माझा सीनियर जय याला वाटायचे की माझा थ्रो चांगला आहे, म्हणून त्याने मला त्यांच्यासोबत खेळायला बोलावले. मला माहीत नाही काय झाले, किंवा त्यात मला काय आवडले, पण मला हे जाणवले की बस, हाच खेळ आपण स्वीकारायचा. या खेळात कधी आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू अशी कल्पना मी कधीच केली नव्हती. मी त्यात जीव ओतला, खूप मेहनत केली. मी सुदैवी होतो की मला माझे कुटुंब आणि सिनियर्स यांच्याकडून चांगला सपोर्ट मिळाला, मार्गदर्शन मिळाले. आणि आज मी माझ्या देशासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे.”

संस्थेला दान केली जाणार जिंकलेली रक्कम

हे दोघे खेळाडू एका उदात्त हेतूने खेळतील. या खेळात जिंकलेली रक्कम श्रीजेश केरळ सरकारचा उपक्रम असलेल्या विद्याकिरणम् या संस्थेला तर नीरज चोप्रा इंस्टीट्यूट ऑफ स्पोर्ट्स ऑफ बेल्लारी कर्नाटकला दान देईल.

बातम्या आणखी आहेत...