आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:भाषेच्या अडथळ्यावर मात करत सारेगमप लिटिल चॅम्प्सची विजेती ठरली आर्यनंदा बाबू, राहते भाड्याच्या घरात, सांगतेय आपल्या 'या' खास स्वप्नाविषयी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आर्यनंदा बाबू म्हणते - मी हा विजय माझ्या आई-वडिलांना समर्पित करते.

गेले अनेक महिने ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधील बालस्पर्धकांनी आपल्या असामान्य गायनकौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. रविवार, 11 ऑक्टोबर रोजी या सांगितिक रिअॅलिटी कार्यक्रमाच्या आठव्या पर्वाची अखेरची फेरी पार पडली. या अंतिम फेरीत आर्यनंदा बाबू हिने बाजी मारत पुरस्कारावर आपले नाव कोरले. तिने मानाचा चषक तर जिंकलाच, पण तिला बक्षिसापोटी पाच लाख रुपये रोख रक्कमही देण्यात आली. यानिमित्ताने आर्यनंदा हिच्या मारलेल्या या खास गप्पा...

 • ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या या आठव्या पर्वाची विजयी चषक जिंकल्यावर तुला काय वाटत आहे?

यामुळे माझं मन पूर्णपणे भारावून गेलं आहे. मी जिंकले आहे, यावर माझा अजून विश्वासच बसत नाहीये. झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या स्पर्धेत मी सहभागी झाले, याचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे. माझं नाव विजेती म्हणून घोषित झाल्यावर मला रडूच फुटलं. मी स्वत:ला भाग्यवान समजते आणि हे विजेतेपद म्हणजे परमेश्वराने मला दिलेली भेटच आहे, असं मी समजते. लॉकडाऊनच्या काळात मी मुंबईत राहिले आणि भरपूर सराव केला. ती सर्व मेहनत फळाला आली, असं वाटतं.

 • ही स्पर्धा जिंकण्यात कोणत्या गोष्टीची मदत झाली, असं तुला वाटतं?

लॉकडाऊन सुरू झाल्यावर बहुतेक सर्व स्पर्धक त्यांच्या मूळ गावी परतले. पण मी आणि माझे बाबा मुंबईतच राहिलो. या काळात मी रात्रंदिवस गाण्याचा सराव केला आणि माझं गायन सुधारण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटतं, माझ्यावर परमेश्वराची विशेष कृपा झाली आहे. त्याचा आशीर्वाद आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्यामुळेच मी ही स्पर्धा जिंकू शकले, असं मला वाटतं.

 • तू किती वर्षांपासून गाणं शिकते आहेस?

माझे वडील हे संगीत शिक्षक असून त्यांनी प्रारंभापासूनच मला संगीत शिकविलं आहे. मी खूप लहान असल्यापासूनच गाण्याची कला शिकले. माझे वडील त्यांच्या विद्यार्थ्यांना संगीत शिकविताना मी पाहात असे आणि मला त्या गोष्टीचं खूप आकर्षण वाटायचं. माझे वडील त्यांच्या विद्यार्थ्यांना कसं संगीत शिकवितात, ते मी ऐकायची. माझे वडील हेच माझे पहिले गुरू आहेत. मला जे काही गाणं येतं आणि मी जे काही शिकले आहे, ते सर्व त्यांनीच मला दिलं आहे.

 • या क्षेत्रात तुझं प्रेरणास्थान कोण आहे?

माझ्या जीवनात माझे वडील हेच माझं पहिलं प्रेरणास्थान असलं, तरी मी लता मंगेशकर यांची विलक्षण चाहती आहे. मला मोठेपणी त्यांच्यासारखंच व्हायचं आहे. मला त्यांच्यासारखी लोकप्रिय गायिका व्हायचं आहे.

 • तुला कोणत्या संगीतकाराबरोबर काम करावंसं वाटतं?

मला ए. आर. रेहमान यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा अससून मी त्यांची फार मोठी चाहती आहे.

 • तुला हिंदी भाषा नीट समजत नसताना तू हिंदी गाणी इतक्या उत्तम प्रकारे कशी गायलीस?

गतवर्षी या स्पर्धेच्या शेवटच्या ऑडिशनच्या वेळी मला हिंदी भाषेतील एकही शब्द येत नव्हता. मी दाक्षिणात्य राज्यातील असल्याने माझ्यापुढे हिंदी भाषेचा फार मोठा अडथळा उभा होता. मला हिंदी बोलता येत नव्हतं. मला हिंदी येत नसल्याने मला त्यातील शब्दांचा योग्य उच्चार कसा करायचा आणि त्यांचा अर्थ काय, हे ठाऊक नव्हतं. त्यामुळेच मला हिंदी भाषेची ओळख करून देण्यासाठी शिकवणी लावली गेली. त्याचा खूप फायदा झाला. काही काळाने मला या भाषेचा सराव झाला. कोणत्याही गाण्याच्या ओळी इतक्या कमी शब्दांत पाठ करणं हे अवघड होतं, खरं तर माझ्यासाठी आव्हानच होतं, तरी ती गाणी शिकताना मला खूप मजा आली. त्यामुळे आता जेव्हा मला गाणं गायचं असतं तेव्हा मला वेगवेगळ्या भाषा शिकायच्या आहेत. त्याचा प्रारंभ मी बॉलिवूडच्या गाण्यांनी करणार आहे.

 • हा विजय तू कोणाला अर्पण करणार आहेस?

मला आणि माझ्या कुटुंबियांना मी ही स्पर्धा जिंकेन, असं वाटतच नव्हतं. त्यामुळे माझ्या घरचे सर्वजण आनंदाने वेडे झाले आहेत. मी हा विजय माझ्या आई-वडिलांना समर्पित करते. त्यांच्याशिवाय मी आज जिथे आहे, तिथपर्यंत पोहोचूच शकले नसते. माझे आई-वडील हे दोघेही संगीत शिक्षक आहेत. माझी आई हिंदी गाणी मल्याळी भाषेत लिहून मला देत असे. मी या दोघांची कायमची ऋणी राहीन.

 • आता तू ही स्पर्धा जिंकली आहेस. मग आता तुझ्या भावी योजना काय आहेत?

मला सर्व प्रकारचं संगीत आणि विविध भाषा शिकायच्या आहेत. मी हिंदी तर निश्चितच शिकेन, पण मी इतर भाषाही शिकणार आहे.

 • तू पाच लाख रुपयांचं रोख बक्षीसही जिंकलं आहेस. या पैशांचं तू काय करणार आहेस?

सध्या आम्ही भाड्याच्या घरात राहतो. आता या मिळालेल्या पैशातून आम्ही स्वत:च्या मालकीचं घर घेण्याचा प्रयत्न करू. यातील काही रक्कम मी माझ्या शिक्षणासाठीही बाजूला ठेवणार आहे.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser