आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:अभिनेता आशिष रॉय यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली, अखेरच्या काळात उपचारांसाठीही नव्हते पैसे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अखेरच्या काळात त्यांच्याकडे उपचारांसाठीही पैसे नव्हते.

'ससुराल सिमर का' आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' सारख्या मालिकांमध्ये झळकलेले अभिनेते आशिष रॉय यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. ते 55 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंड निकामी झाल्याने ते सतत आजारी होते. आज (24 नोव्हेंबर) पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांनी जोगेश्वरी येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अखेरच्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची झाली होती. रुग्णालयाचे बिल भरणे कठीण होत असल्यामुळे ते काही दिवसांपूर्वीच घरी परतले होते.

आशिष यांचे जवळचे मित्र सूरज थापर यांनी दिव्य मराठीसोबत बोलताना सांगितले की, ''गेल्या काही वर्षांपासून आशिष यांना किडनीचा आजार होता. ते स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या प्रयत्न करत होते, यात त्यांना काही प्रमाणात यशदेखील आले होते. कलर्स वाहिनीशी एका मालिकेसंदर्भात त्यांची बोलणीदेखील सुरु होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक डबिंगही केले होते. अचानक आज सकाळी 3.30 च्या सुमारास त्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. त्यांच्या छातीत दुखू लागले होते. जो मुलगा त्यांच्या मदतीसाठी त्यांच्याजवळ होता, त्याला त्यांनी आपल्या त्रासाविषयी सांगितले होते. मुलाशी बोलत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.''

कुटुंबात एकमेव बहीण

आशिष यांनी लग्न केले नव्हते. त्यांच्या कुटुंबात फक्त एक बहीण आहे. ती कोलकाता येथे राहते. आज संध्याकाळपर्यंत त्यांची बहीण मुंबईत पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

फेसबुक पोस्टमधून व्यक्त केले होते दुःख

अखेरच्या काळात त्यांच्याकडे उपचारांसाठीही पैसे नव्हते. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहून त्यांनी अशा प्रकारे जीवन जगणे खूप कठीण आहे, अशी खंत व्यक्त केली होती. त्यांनी अभिनेता सलमान खानकडे मदतीसाठी याचना केली होती.

ते म्हणाले होते, "आतापर्यंत उपचारासाठी जवळपास 4 लाख रुपये खर्च आला आहे. गेल्या 8 महिन्यांपासून कोणतेही उत्पन्न नाही. म्हणून मी उपचार अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उपचाराविना मी घरी मेलो तरीसुद्धा काही दु: ख नाही. सध्या मला कुणीही आर्थिक मदत करत नाहीये. माझे आयुष्यभराची बचत खर्च झाली आहे. आता असे आयुष्य जगणे फार अवघड आहे.'

रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी नव्हते पैसे

ते म्हणाले होते, "माझे डायलिसिस चालू आहे पण तब्येतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. मला माहित नाही की मी येथे किती काळ उपचार घेऊ शकेन कारण रुग्णालयाचे बिल प्रत्येक वाढत्या दिवसाबरोबर वाढतच आहे. दोन दिवसांचे बिल जवळपास दोन लाख रुपये झाले आहे. ते पैसे मी भरले परंतु आता अधिक काळ मी रुग्णालयात उपचार घेऊ शकणार नाही. कारण माझ्याकडे आता एक पैसाही उरलेला नाही. मी पुरता कंगाल झालो आहे. आता मला केवळ सलमान खानकडूनच मदतीची अपेक्षा आहे. मला खात्री आहे की माझी अवस्था पाहून तो मला नक्की मदत करेल.”

मागील काही वर्षांत आशिष यांच्याकडे काम नव्हते

2019 च्या सुरुवातीच्या महिन्यात आशिष यांना अर्धांगवायू झाला होता. त्यावेळी आशिष म्हणाले होते की, "मी अर्धांगवायूच्या झटक्यानंतर बरा झालो, पण मला काम मिळाले नाही. मी सध्या माझ्या बचतीवर आयुष्य जगतोय पण तेही संपुष्टात येणार आहे. मला कोलकातामध्ये माझ्या बहिणीकडे शिफ्ट केले जाईल, पण इंडस्ट्रीमधील एखाद्याने मला काम द्यावे, अन्यथा काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे.' आशिष एक व्हॉईस-ओवर आर्टिस्टदेखील होते. त्यांनी ‘सुपरमॅन रिटर्न्स, ‘द डार्क नाइट’, ‘गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘द लेजेंड ऑफ टार्झन’ आणि ‘जोकर’ या हॉलिवूडपटांसाठी डबिंगही केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser