आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका चर्चेत आली आहे. या मालिकेत काम केलेल्या कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर निर्मात्यांवर अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आरोप केले होते. नुकतेच त्यांनी त्यांचे तसेच इतर कलाकारांचे लाखोंचं मानधन निर्मात्यांनी थकवले असल्याचा आरोप केला होता. शैलेष लोढा यांनी मालिका सोडून सहा महिन्यांचा काळ लोटला आहे, मात्र तरीही त्यांचे वर्षभराचे पैसे निर्मात्यांनी दिलेच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणी मालिकेच्या निर्मात्यांच्या वतीन प्रोजेक्ट हेड सुहेल रमानी यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले 'तारक मेहता'चे प्रोजेक्ट हेड?
सुहेल रामणी यांनी शैलेश लोढा यांच्या आरोपांवर उत्तर देताना म्हटले, "शैलेश लोढा यांच्या काही कागदपत्रांवर सह्या घ्यायच्या आहेत. त्या सह्या करून तुमचे पेमेंट घेऊन जा, असे त्यांना अनेकदा सांगण्यात आले होते. परंतु ते आलेच नाहीत. जेव्हा तुम्ही कोणतीही कंपनी किंवा शो सोडता तेव्हा नेहमी एक प्रक्रिया असते, ज्याचे पालन करणे आणि पूर्ण करणे आवश्यक असते. कलाकार, असो वा कर्मचारी किंवा एखादा टेक्निशियन या सगळ्यांना हे करणे भाग असते. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतीच कंपनी तुमची थकबाकी देऊ शकत नाही."
रामणी पुढे म्हणाले की, "तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला एक प्रतिष्ठा आहे. कंपनीने कोणाचेही एका दिवसाचे मानधन थकवले नाही. असे काही असते तर कोणत्याच कलाकाराने आमच्यासोबत काम केले नसते. पण मालिकेतलेच कलाकार जेव्हा अशा पद्धतीनं वागतात तेव्हा खूप वाईट वाटतं. डेलीसोप करणाऱ्या कलाकारांनीही काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. TMKOC साठी टीम दिवसरात्र मेहनत करत असते," असेही त्यांनी पुढे म्हटले.
2022 मध्ये शैलेश यांनी अचानक शो सोडला - सुहेल
सुहेल यांनी सांगितल्यानुसार, 'शैलेश यांनी 2022 मध्ये कोणतीही सूचना न देता अचानक शो सोडला. त्यामुळे निर्माते आणि त्यांच्यातील वाद आणखी वाढला.'
या कारणामुळे शैलेश यांनी सोडला शो
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश यांनी 'तारक मेहता...' हा शो सोडण्यामागचे कारण म्हणजे त्यांचे निर्मात्यांशी वैचारिक मतभेद होते. त्यामुळे त्यांनी कोणतीही सूचना न देता शो सोडला. या प्रकरणावर शैलेश यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
नेहा मेहता आणि राज अनादकट यांनाही थकीत पैसे मिळाले नाहीत
शैलेश यांच्याव्यतिरिक्त, टप्पूची भूमिका करणारा राज अनादकट आणि अंजली मेहताच्या भूमिकेत झळकलेली नेहा मेहता यांनादेखील निर्मात्यांनी अद्याप पैसे दिलेले नाहीत. शो सोडल्यानंतरही नेहाचे 30-40 लाख रुपये थकले असल्याची चर्चा आहे.
अनेक कलाकार 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमधून बाहेर पडले आहेत. अलीकडेच, TMKOC चे दिग्दर्शक मालव राजदा यांनी देखील या शोला निरोप दिला. मागील 14 वर्षांपासून त्यांनी या शोच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.
शोमध्ये झाली आहे नवीन तारक मेहताची एन्ट्री
शैलेश लोढा या शोमधून बाहेर पडल्यानंतर निर्माते बऱ्याच दिवसांपासून नवीन तारक मेहताच्या शोधात होते. आता निर्मात्यांचा हाशोध संपला आहे, आता शैलेशच्या जागी अभिनेता सचिन श्रॉफ शोमध्ये तारक मेहताच्या भूमिकेत दिसणार आहे. पण तारक मेहता का उल्टा चष्माचे चाहते त्यांच्या जुन्या मेहता साहेबांना मिस करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.