आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत सूर्यवंशीचे 11 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या 46 व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली. मुंबईतील जिममध्ये वर्कआउट करताना सिद्धांत खाली कोसळला, त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले. तासभर शर्थीचे प्रयत्न करुनही डॉक्टरांना त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. त्याच्या पश्च्यात पत्नी आणि एक मुलगी आहे. फिटनेस फ्रिक असलेल्या सिद्धांतच्या अकाली निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनावर त्याच्या मित्रांनी आता एक मोठा खुलासा केला आहे. सिद्धांत गेल्या काही दिवसांपासून तणावात होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले आहे.
तणावामुळे आला हार्ट अटॅक
सिद्धांतच्या मित्रांनी त्याच्या मृत्यूसंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. केवळ जीम केल्याने सिद्धांतचा मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मृत्यूपूर्वी काही दिवस तो प्रचंड तणावात असल्याचे समोर आले आहे. सिद्धांतची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री विश्वप्रीत कौर हिने पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत तो प्रचंड तणावात असल्याचे म्हटले आहे. विश्वप्रीत म्हणाली, 'येथे कोणता कलाकार तणावाखाली नसतो? सिद्धांतही गेले काही दिवस तणावाखाली होता. आम्ही दोघे शुक्रवारीच भेटणार होतो. त्याने म्हटलेलं जीमनंतर आपण भेटूया. तो काही दिवसांपूर्वीच मला भेटायला आला होता. तो माझा सगळ्यात चांगला मित्र होता. मी त्याला सांगायचे की तू योग कर तुझा तणाव कमी होईल. आता त्याच्यासोबत जे घडले आहे, यावर माझा विश्वास बसत नाहीये,' असे विश्वप्रीत म्हणाली.
आपल्या पश्च्यात सोडून गेला कोट्यवधीची संपत्ती
सिद्धांत छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता होता. त्याने 2001 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले. आपल्या पश्च्यात तो कुटुंबासाठी 5 ते 10 कोटींची संपत्ती सोडून गेल्याचे म्हटले जाते. त्याच्या पश्च्यात त्याची पत्नी आणि 18 वर्षांची मुलगी आहे. त्याच्या पत्नीचे नाव एलेसिया राऊत आहे. एलेसिया ही त्याची दुसरी पत्नी आहे. पाच वर्षांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. सिद्धांत आणि एलेसिया यांचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी असून दिजा हे तिचे नाव आहे. ती आता 18 वर्षांची आहे. तर एलेसिया हिलादेखील पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.