आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'पुण्यश्लोक अहिल्याबाई' ही मालिका 4 जानेवारी पासून छोट्या पडद्यावर दाखल झाली आहे. या मालिकेतून अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनाचा पट उलगडलेला आहे. जिद्द, निश्चय आणि धैर्यवान व्यक्तीमत्त्वाच्या आधारे अहिल्याबाईंनी, सासरे मल्हारराव होळकरांच्या पाठिंब्याने 18 व्या शतकातील सामाजिक रुढींविरुद्ध संघर्ष केला.
पुरातन कालखंडातील कथानक हे नेहमीच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होते. कारण त्यात एका युगाचे संपूर्ण वैभव दाखवलेले असते. अर्थात इतरांपेक्षा या कार्यक्रमात काही गोष्टी अधिक आकर्षक बनवण्यात आल्या आहेत, हे सांगण्याची गरज नाही. ऐतिहासिक मालिकेत कॉश्च्युम डिझाइन ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. संबंधित युगाचे आणि त्या काळातील सांस्कृतिक परंपरांचे प्रतिबिंब त्यात उमटत असते.
या मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर यांची भूमिका असून त्या गौतमीबाई अर्थात मल्हारराव होळकर यांच्या पत्नी व अहिल्याबाईंच्या सासूबाईच्या भूमिकेत आहेत. गौतमीबाई या प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या, कर्मकांड व परंपरांचा अभिमान बाळगणाऱ्या होत्या. त्यांचे शक्तीशाली व्यक्तीमत्त्व स्क्रीनवर चितारण्यासाठी 18 व्या शतकातील समृद्धीवर लक्ष केंद्रीत केले. या प्रेरणेतून, महाराष्ट्रीयन माळवा संस्कृती अर्थात 15-18 व्या शतकातील काळाचा अभ्यास केला गेला. जेणेकरून या वेशभूषेची डिझाइन थेट इतिहासाच्या पानांतून आल्यासारखे वाटेल.
स्नेहलता वसईकर यांच्या वेशभूषाकार रोहिणी हेमंत तांडेल म्हणाल्या, 'गौतमीबाईंबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली गेली होती. त्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी एक जबरदस्त लँडस्केप मिळाला. गौतमीबाई या पारंपरिक महिला होत्या, त्यामुळे त्यांचे दागिने आणि वेशभूषा त्यांची ‘धनगर’ जात दर्शवणारी असावी, असे आम्ही ठरवले. तसेच त्यांच्या सर्व दागिन्यांमध्ये आम्ही ‘लक्ष्मी’ समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला, कारण ती स्वत:ला घरची लक्ष्मी समजत असे.'
पुढे रोहिणी तांडेल म्हणाल्या, 'स्नेहलता यांच्या साड्या खास पद्धतीने तयार केल्या आहेत. त्यात महाराष्ट्रीयन खण कापड, त्यासोबत लेस, रेशीम आणि ब्रॉकेडचा वापर करण्यात आला. मालिकेत त्या जे पात्र साकारत आहेत, त्यानुसार आम्ही वेशभूषेसाठी चमकदार रंगांचा वापर केला. मला वाटते, या सर्वांचा परिणाम खूपप चांगला झाला असून स्नेहलतांचा लूक अधिक रुबाबदार दिसत आहे.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.