आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकाटात अभिनेता:अभिनेते लोकेंद्र सिंह राजावत यांच्यावर ओढावली कठीण परिस्थिती, म्हणाले - तणावामुळे मधुमेह वाढला आणि मग गँगरीनमुळे जीव वाचवण्यासाठी पाय कापावा लागला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील आठवड्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.

छोट्या पडद्यावरील गाजलेल्या 'जोधा अकबर' आणि 'ये है मोहब्बतें' या मालिकेत झळकलेले अभिनेते लोकेंद्र सिंह राजावत यांच्यावर कठीण परिस्थिती ओढावली आहे. गँगरीनमुळे जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्यांचा एक पाय कापावा लागला आहे. लोकेंद्र यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीविषयी खुलासा केला.

लॉकडाउनच्या काळात हातात काम नव्हते, पैशांची चणचण निर्माण झाली. त्यामुळे सततच्या तणावामुळे रक्तातील साखरेची पातळी धोक्याबाहेर गेली. त्यातच गँगरीन झाला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी मागील आठवड्यात गुडघ्यापासून त्यांना आपला एक पाय कापावा लागला. मुंबईतील मीरा रोड स्थित भक्तिवेदांत रुग्णालयात त्यांच्यावर पाच तास शस्त्रक्रिया झाली.

आपली आपबिती सांगताना लोकेंद्र यांना कोसळले रडू
लोकेंद्र यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले - "मी आता काही करु शकत नाही. महामारी येण्यापूर्वी मी योग्य पद्धतीने माझे काम करत होतो. पण कोरोनामुळे नंतर काम मिळणे बंद झाले. त्यामुळे पैशांची अडचण निर्माण झाली. आर्थिक संकटामुळे मी सतत तणावात राहू लागलो. त्यामुळे मधुमेह वाढला. त्यातच माझ्या उजव्या पायाला गाठ आली, ज्याकडे मी दुर्लक्ष केले. येथूनच सगळी सुरुवात झाली. हळूहळू तो संसर्ग बोन मॅरोपर्यंत पोहोचला. मला गँगरीन झाले. मला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे दुसरा काही पर्याय नव्हता. डॉक्टरांना माझा उजवा पाय कापावा लागला."

मी जर स्वतःची काळजी घेतली असती तर कदाचित ही वेळ आली नसती
लोकेंद्र म्हणतात- "मला दहा वर्षांपूर्वी मधुमेह झाला होता. जर मी तेव्हाच याकडे लक्ष दिले असते, तर आज माझ्यावर कदाचित ही परिस्थिती आली नसती. शूटिंगच्या काळात कलाकारांकडे कोणताही निश्चित वेळ नसतो. आमचे अवेळी जेवण आणि अनियमित कामाचे तास हे आमच्या आरोग्यासाठी वाईट असतात. त्यामुळे ताण वाढतो.' त्यांनी सांगितल्यानुसार, शस्त्रक्रियेसाठी त्यांना CINTAA कडून आर्थिक मदत मिळाली आहे. तसेच इतर काही कलाकारांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली आहे.

कृत्रिम पाय लावणार
लोकेंद्र यांनी आता कृत्रिम पाय लावण्याचा विचार केला आहे. यासाठीही त्यांना आर्थिक मदत केली जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत. लोकेंद्र विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. 'ये है मोहब्बतें' आणि 'जोधा अकबर'सह लोकेंद्र यांनी सीआयडी, क्राइम पेट्रोलमध्येही काम केले आहे. 50 वर्षीय लोकेंद्र रणबीर कपूरच्या 'जग्गा जासूस' आणि मिजान जाफरीच्या 'मलाल' या चित्रपटातही झळकले.

बातम्या आणखी आहेत...