आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:ब्रिटनमध्ये पाच महिन्यांत 22 हजारांवर नवे रुग्ण, हाँगकाँग, स्पेनने ब्रिटनच्या प्रवासावर घातले निर्बंध

लंडन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र टॉटेनहॅम हॉटस्पर स्टेडियमचे आहे. लसीसाठी रांगा लागत आहेत. - Divya Marathi
छायाचित्र टॉटेनहॅम हॉटस्पर स्टेडियमचे आहे. लसीसाठी रांगा लागत आहेत.

ब्रिटनमध्ये सुमारे पाच महिन्यांनंतर २२ हजारांहून जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी येथे नवे २२ हजार ८६८ रुग्ण आढळून आले आहेत. याच वर्षी ३० जानेवारीला २३ हजार १०८ नवे रुग्ण आढळले होते. ब्रिटनमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ३,०७,७७६ एवढी झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सेल्फ आयसोलेशनमुळेही सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे आई-वडील त्रस्त झाले आहेत. मुलांच्या शिक्षणावरदेखील परिणाम होताना दिसतो. आता सरकार विद्यार्थ्यांचे सेल्फ आयसोलेशन संपवण्याची तयार करत आहे. शालेय मंत्री निक गिब मंगळवारी म्हणाले, आम्ही मुलांसाठी सेल्फ आयसोलेशनव्यतिरिक्त दैनंदिन पातळीवर कॉन्टॅक्ट टेस्टिंगवर भर देऊ इच्छितो. सरकार १९ जुलैच्या आधी याबद्दल निर्णय घेईल.

ब्रिटनमध्ये १७ जूनपर्यंत १.७० लाख विद्यार्थी सेल्फ आयसोलेशनमध्ये होते. ही मुले कोरोना झालेल्यांच्या संपर्कात आली होती. हे अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांपैकी २ टक्के एवढे प्रमाण आहे. त्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे सरकार व पालक दबावाखाली आले होते. मुलांचे सेल्फ आयसोलेशन आता संपवण्यात यावे, अशी पालकांची मागणी आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पालकांना नोकरी किंवा कामासाठी घराबाहेर पडणेही कठीण झाले. हाँगकाँगने ब्रिटनच्या विमानांना तूर्त निर्बंध लागू केले आहेत. स्पेननेदेखील ब्रिटनला निर्बंधमुक्त यादीतून हटवले. नव्या आदेशानुसार स्पेनमध्ये केवळ लसीकरण झालेले किंवा कोरोना निगेटिव्ह अहवाल असलेल्या ब्रिटिश प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे.

अमेरिकेचा नागरिकांना यूएई, आफ्रिकेबाबत अलर्ट जारी
अमेरिकेने यूएई व चार आफ्रिकन देशांसाठी आवश्यक प्रवासाबद्दलचा इशारा जारी केला आहे. अमेरिकी नागरिकांनी या देशांत जाऊ नये. यूएईमध्ये कोरोना लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे. परंतु मार्चनंतर कोरोनाचे नवे रुग्ण वेगाने वाढत आहेत. लायबेरिया, मोझाम्बिक, युगांडा, झाम्बिया इत्यादी आफ्रिकन देशांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. यूएई व चारही आफ्रिकन देशांना अमेरिकेने श्रेणी-४ मध्ये ठेवले आहे.

दिवसभरात ३ लाख रुग्ण; सर्वाधिक भारत, कोलंबियात
सोमवारी जगभरात कोरोनाचे ३.१७ लाखांहून जास्त रुग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक भारतात ३७ हजार व कोलंबियात २८ हजार रुग्ण आढळले. त्याशिवाय ब्राझीलमध्ये २७ हजार, रशियात २१ हजार, अर्जेंटिनात १८ हजार, अमेरिकेत १० हजार रुग्ण आढळले. दक्षिण ऑफ्रिका, कोलंबियात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्ण वाढले आहेत. दक्षिण आफ्रिकेत तिसरी लाट धडकली आहे. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली. या व्हेरिएंटमुळे आफ्रिकेत मोठी हानी होण्याची भीती आहे.

ऑस्ट्रेलियाचे निम्मे लोक लॉकडाऊनच्या कक्षेत
ऑस्ट्रेलियाची निम्मी लोकसंख्या सुमारे १२ कोटी लोक लॉकडाऊनच्या कक्षेत आले आहेत. सिडनीपासून लागू झालेला लॉकडाऊन इतर भागातही लागू केला जाणार आहे. गेल्या चोवीस तासांत ब्रिस्बन, पर्थ, डर्विनमध्येही लॉकडाऊन लागू झाला आहे. आॅस्ट्रेलिया कोरोनाशून्य धोरणावर काम करत आहे. ऑस्ट्रेलियात सोमवारी ३० नवे रुग्ण आढळले होते. परंतु डेल्टा व्हेरिएंटमुळे निर्बंधांत वाढ करण्यात आली आहे. लोक हैराण आहेत.

बातम्या आणखी आहेत...